झेडपी’ शाळा टिकविण्यासाठी एकदिलाने कार्य करा;विस्तार अधिकारी शितलकुमार वानखडे ; निंबी येथे भोजला केंद्राची पहिली शिक्षण परिषद संपन्न !
पुसद : गोरगरीब व वंचितांच्या पाल्यांना खाजगी संस्थांनधून शिक्षण घेणे परवडणारे नसून त्यांना मोफत व हक्काचे शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांनी एकमेकांतील हेवेदावे विसरुन एकदिलाने कार्य करुन व विविध शैक्षणिक उपक्रम राबवून झेडपीच्या शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पुसद पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा गटसमन्वयक शितलकुमार वानखडे यांनी केले.ते निंबी येथे शनिवारी (ता.४) भोजला केंद्राची या शैक्षणिक सत्रातील पहिली शिक्षण परिषदेला संबोधित करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंबी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश काचगुंडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून गुणवंतराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पोले,भोजला केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख संघपाल आडोळे,निंबी शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम वानखेडे,पार्डी शाळेचे मुख्याध्यापक संतोष पदमवार,बीआरसी विषय तज्ज्ञ श्रीधर सोनुने आदी मान्यवर उपस्थित होते.सुरवातीला मान्यवरांनी आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.नव्यानेच रुजू झालेले केंद्रप्रमुख संघपाल आडोळे यांनी गुणवत्तेवर भर देत गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना काय काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पोले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या शैक्षणिक धोरणावर साधक बाधक चर्चा घडवून आणली आणि सविस्तर अशी माहिती दिली. याप्रसंगी पदवीधर विषय शिक्षक शशिकांत जामगडे यांनी आपल्याला जिल्हा परिषद शाळा कशा टिकवता येतील या संदर्भाने मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. श्री. सोनुने यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नोंदी युडायस ला करुन लाभाच्या योजनांची माहिती दिली.सूत्रसंचालन किरण कुंभारे यांनी केले तर आभार मदन गरकल यांनी मानले.यशस्वीतेसाठी निंबी येथील सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला.
एकीकडे विद्यार्थी संख्या कमी होऊन जि.प. शाळा बंद पडत असतांना कवडीपुरच्या जि.प.शाळेने पटसंख्येचा आलेख चढता ठेवून नव्यानेच इयत्ता नववी चा वर्ग सुरू करुन पुसदमध्ये नवा इतिहास रचल्याबद्दल मान्यवरांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले व या यशासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण,शिक्षक शशिकांत जामगडे,संध्या बेद्रे,सिमा येरावार,अर्चना यादव,मनिषा काण्णव,माधव कानगुले,गणेश शिंदे व रंजना कोटगीरवार यांचे विशेष स्वागत केले.



