गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार; वसंत नगर पोलिसांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांचा हात झटकत बेड्याही लांबविल्या ...

पुसद :वसंत नगर पोलीस ठाण्यातील आरोपीला उपजिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना घडल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दि.४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या दुपारी अंदाजे १:०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंत नगर पोलिसांसह पोलीस उपविभागातील पोलीस पथके अँक्शनमोड मध्ये आले असून पसार झालेल्या आरोपीचा कसुन शोध घेतला जात आहे.या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हजरत बिलाल शेख मुसा वय अं २१ वर्ष रा.वसंत नगर असे या फरार आरोपीचं नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.२सप्टेंबर २०२६रोजी सुभाष वार्ड येथील ३५वर्षीय इस्मावर आरोपी हजरत बिलाल शेख मुसा आणि एका अल्पवयीनाने खुनाचा प्रयत्न(Attempt to Murder) जीवे मारण्याच्या हेतूने केलेल्या हल्ल्यात समोरच्या व्यक्तीला दुखापत झाली होती त्याप्रकरणी या आरोपींना भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९ गुन्हा दाखल करण्यात आला होता ते अटक होते पोलिसांनी शुक्रवारी दि.४ सप्टेंबर सकाळी पुसद न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असता त्यांना उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे वैद्यकीय तपासणी करुन वसंत नगर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये घेऊन जाणार होते.पंरतु अशातच तो पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन हवालदाराच्या ताब्यातून पसार झाला आहे.या प्रकरणी वसंत नगर पोलिसांनी फरार आरोपी बिलाल याच्या विरोधात वसंत नगर पोलीस ठाण्यात कलम २६२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.आरोपी पळाल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत तात्काळ नाकेबंदी करण्यात आली आहे. आरोपीला पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात केली गेली असून आरोपींचा कसुन शोध सुरू आहे.परंतु या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचा पुन्हा एकदा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे तर आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतील बेजबाबदारपणामुळे किंवा निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने, कर्तव्यावर असलेल्या या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबिनांची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.



