ईतर

खंडाळा घाटात वाशिम मार्गावर थरार : धावत्या महामंडळाच्या बसला भीषण आग; प्रवाशांची सुखरूप सुटका!

पुसद : वाशिम ते पुसद मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला आज मंगळवार (दि. १४) रात्री७:३०वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच बसचा समोरील भाग आगीच्या विळख्यात सापडला याबाबत ‘झेप न्यूज ला’सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  वाशिमहुन पुसदकडे वाशीम डेपोची बस (क्रमांक एमएच १४ बीटी ४५५८) प्रवाशांना घेऊन रवाना झाली होती. बस भरधाव वेगात असताना चालकाच्या निदर्शनास स्टेअरिंगजवळून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली.

वाहक आणि चालकाने क्षणाचाही विलंब न लावता सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर उतरविले. या दरम्यान, बसने काही क्षणांतच पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता बस ज्वाळांनी वेढली गेली. प्रवाशांनी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी हा थरार उघड्या डोळ्यांनी अनुभवला.

या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला मिळताच अग्निशमन दल तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत आगीने रुद्ररुप धारण केले होते.या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र या बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close