सामाजिक

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानाचं थोडं महत्त्व आणि पार्श्वभूमी, व थोडं चिंतन…

सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या लाख लाख मन:पूर्वक शुभेच्छा!

सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या लाख लाख मन:पूर्वक शुभेच्छा!

आदिवासी हा शब्द ‘आदि’ आणि ‘वासी’ या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ आधीपासून किंवा आदिम कालखंडापासून वास करणारा असुन आदिवासी समाज निसर्गाला देव मानून जगतो.प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतःची वेगळी भाषा, बोलीभाषा, वेशभूषा आणि सण असतात ते नैसर्गिक संसाधनांचा वापर अत्यंत मर्यादित आणि काळजीपूर्वक करतात पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी निसर्गातील जंगलांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यात आदिवासींची भूमिका मोलाची असते.तर आदिवासी समाज निसर्गप्रेमी असल्यामुळे व त्यांचे वास्तव्य डोंगराळ भागात असल्यामुळे त्यांना पिढ्यानपिढ्या पर्यावरण व औषधी वनस्पतींचे ज्ञान ते तोंडी स्वरूपात जतन करतात.
आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासीचे समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या वर आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटींच्यावर असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून भारतात वास्तव्य करून आहे.
आदिवासी समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज असून निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा, निसर्गावर प्रेम करणारा व निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करणारा समाज आहे. असे असूनही जगात सर्वात जास्त शोषण हे आदिवासींचे झालेले आहे व आजही होत आहे. त्यांना मागासलेले, रानटी, वनवासी,असे संबोधून त्यांना हिणवले जाते. त्यांना त्यांच्या अधिकारांपासून, हक्कांपासून वंचित ठेवले जाते.
ही अशी परिस्थिति लक्षात घेऊन त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी १९६० च्या दशकात अमेरिकेत तसेच विविध देशांमध्ये चळवळी सुरू झाल्या. तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने १९८२ मध्ये ९ ऑगस्ट रोजी जिनिव्हामध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले. यानंतर पुढील काही वर्षे जागतिक पातळीवर बैठकांच्या माध्यमातून सतत चर्चा, विचारमंथन होत राहिले. पुढे संयुक्त राष्ट्राने १९९४ हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तसेच १९९५ ते २००५ हे पहिले आदिवासी दशक तर २००५ ते २०१४ हे दुसरे आदिवासी दशक म्हणून घोषित केले. ९ ऑगस्ट १९८२ रोजी जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीची आठवण म्हणून जागतिक स्तरावर आदिवासींना एकत्र आणणे, त्यांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडविणे, त्यांच्यावरील अन्याय, त्यांचे होणारे शोषण थांबविणे, हा आदिवासी दिनाचा मुख्य उद्देश हा दिवस साजरा करण्यामागचा आहे.
भारतीय राज्यघटनेत त्यांचा अनुसूचित जमाती (Schedule Tribe –ST) असा उल्लेख करण्यात आलेला असून त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. आदिवासी समाजाने त्यांना त्याचे श्रेय द्यायला हवे.
भारतातील आदिवासी समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, असा अनेकांचा समज आहे. या संदर्भात माझ्या लक्षात आलेल्या काही बाबी मी आपल्यासमोर ठेवतो. भारतात विवाहाशी संबंधित अनेक अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी व चांगल्या प्रथा सुरू करण्यासाठी अनेक कायदे करावे लागले आहेत किंवा समाजसुधारकांना शे-दीडशे वर्षे आपली लेखणी व वाणीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागली आहे. (उदा. – विधवा विवाहाचा कायदा, हुंडाबंदी कायदा, जरठ-कुमारीविवाह बंदी, केशवपन-सतीप्रथा बंदी, घटस्फोटाला परवानगी, पुनर्विवाह इ.). भारतातील तथाकथित सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या समाजात अशा अनेक चुकीच्या प्रथा शेकडो वर्षे प्रचलित होत्या.
धार्मिक बाबतीत विचार करू जाता आदिवासी भागात मंदिरे आढळत नाहीत किंवा जी आढळतात ती अगदी अलीकडची आहेत. आदिवासींच्या अनेक प्रथा परंपरा, देवी-देवता, सण-उत्सव, विवाह प्रथा, नृत्य, संगीत, लोकगीत, भाषा, वेशभूषा इ. हे हिंदू अथवा इतर धर्मांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे कागदोपत्री त्यांचा कोणत्याही धर्मात समावेश करण्यात येत असला तरी ते मूळतः निसर्गपूजक असून हा समाज निसर्ग, नद्या, डोंगर, वनस्पती, प्राणी, गावाची वेस इत्यादींची पूजा करणारा आहे. थोडक्यात, आदिवासी म्हणजेच आदिम काळापासून वास करणारे असून नैसर्गिक जीवन, निसर्ग, आदिवासी संस्कृती, साधेपणा हाच त्यांचा धर्म आहे. त्यांची अतिशय प्राचीन, समृद्ध व स्वतंत्र अशी संस्कृती आहे, हे ध्यानात घेऊन त्याची आदिवासी समाजाने दखल घेणे गरजेचे आहे. तेव्हा आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या बाबतीत असलेले समज-गैरसमज दूर करून त्यांना माणूस म्हणून स्वीकारणे व आदिवासी समाजानेही अनेक बाबतीत आत्मचिंतन करणे व स्वत:वर होणार्‍या अन्याय-अत्याचार-शोषण या संदर्भात जागृत होऊन आपली परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालत, आपली पारंपरिक मूल्ये जपून कालानुरूप बदल स्वीकारत विचारपूर्वक भविष्यातील वाटचाल करणे गरजेचे आहे.

सर्वांना पुनश्च एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या लाख शुभेच्छा.!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close