मातृत्वाच्या दातृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी घटना! आईने दिला मुलाला पुनर्जन्म;नांदेड येथे श्री गंगा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण

पुसद: प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान खूप महत्वाचं असतं. कितीही जन्म घेतले तरी तिचं ॠण कुणीही फेडू शकत नाही. असाच पुसद तालुक्यातील आरेगाव येथील एका मुलाला याचा जिवंतपणीच प्रत्यय आला. आईने आपली किडनी प्रत्यारोपण करून मुलाला पुन्हा एकदा पुनर्जन्म दिला आहे.या ‘वात्सल्यसिंधू आई’ च्या प्रेमपूर्ण कृतीने मुलालाही नि:शब्द केले. २४ एप्रिल रोजी नांदेडच्या शिवाजी नगर येथील श्री गंगा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. किडनी प्रत्यारोपण झालेला ॠतीक ठेंगे २१ वर्षीय हा आरेगाव येथील रहिवासी असून तो बीएससी अंतिम वर्षाला पुसद येथील फुलसिंग नाईक विद्यालयात शिक्षण घेतोय.
याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद तालुक्यातील आरेगाव येथील रहिवासी असलेल्या वडील प्रकाश ठेंगे व आई सौ ज्योती ठेंगे वय ४५ वर्षे यांचा मुलगा हा पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात बीएससी अंतिम वर्षा शिक्षण घेत होता त्याचे वय अवघे २१वर्षे. नव्या स्वप्नांना जिद्दीचे पंख लावून आयुष्याला आकार देण्याचे हे वय. पण, नियतीला कदाचित त्याची आणखी परीक्षा पहाण्याची लहर आली. जानेवारी महिन्यात त्याची प्रकृती ढसाळली त्याला पुसद येथील डॉक्टरांना दाखविले असता त्याच्या शरीरातील काही कळायच्या आतच त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचे निदान झाले. अख्खे कुटुंब हादरले. कोलमडून पडण्याची वेळ आली. मात्र पुन्हा एक माता पुढे आली. कठोर झालेल्या नियतीमुळे वादळात चोहोबाजूंनी घेरलेल्या मुलासाठी या मातेने आपले काळीज मोठे केले आणि स्वतःची एक किडनी देऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या आपल्या मुलाला सहीसलामत बाहेर काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी
डॉक्टरांनी ऋतिकला पुढील उपचारासाठी नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलमधील किडनी विकार तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. ऋतिकला घेऊन त्याची आई व नातेवाईक डॉ. शहाजी जाधव यांच्याकडे आले. त्यांनी ऋतिकला किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले. वडील प्रकाश ठेंगे व आई ज्योती ठेंगे यांनी धीर न सोडता ऋतिकला बरे करण्याचा आत्मविश्वास मनात जागविला आणि आईने किडनी देण्याची तयारी दर्शविली. तपासणी झाल्यानंतर आईची किडनी ऋतिकच्या शरीरात दान करण्यास योग्य असल्याचे किडनी तज्ज्ञ डॉ. जाधव यांनी नातेवाईकांना सांगितले. दि. २४ एप्रिल ऋतिकसाठी दुसऱ्यांदा पुनर्जन्म देणारा दिवस ठरला. आईच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ऋतिकच्या शरीरात करण्यात आले. प्रत्यारोपण झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. मातृत्वाच्या दातृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी घटना आहे.या किडनी
प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राजीव राठोड, डॉ. शिवराज टेंगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव, भूल तज्ज्ञ डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली.एकाच आयुष्यात या मातेने दोन वेळा मुलाला जीवदान देऊन मातृत्वाच्या नात्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
दीडशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण..
डॉ. शहाजी जाधव यांनी दीडशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण केले आहे. किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव हे नांदेडच्या शिवाजीनगर येथील श्री गंगा हॉस्पीटल येथे कार्यरत आहेत. लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रेज्यूयट इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स हे देशातील सर्वात मोठे किडनी प्रत्यारोपण करणारी संस्था आहे. तेथे डॉ. जाधव यांनी तीन वर्षे सेवा केली. या काळात त्यांनी दीडशेहून अधिक रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे. सम रक्तगट व भिन्न रक्त गट अशा अनेक गुंतागुंतीच्या व जटील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत
आयुष्याची ज्योत फुलली…
माझा मुलगा ऋतिक याची किडनी निकामी झाल्याचे जेव्हा मला कळले तेव्हा मी व माझे कुटुंब हादरून गेले होते परंतु किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांनी धीर दिला व मार्गदर्शन केले. किडनी प्रत्यारोपण करून मी माझ्या मुलाचे प्राण वाचवू शकले. त्याचा पुनर्जन्म झाला. मी आईचे कर्तव्य पार पाडले. याकरिता डॉ. शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटल येथील डॉक्टरांचे उपकार माझ्यावर आहेत अशा भावना मुलाला किडनी दान केलेली आई ज्योती ठेंगे यांनी व्यक्त केल्या..



