बळीपूजनाच्या दिवशी सफाई कामगार यांचा सन्मान; सौ.शिल्पा देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम!

पुसद : प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका सौ. शिल्पा सुधीर देशमुख तथा समाजसेवक सुधीर देशमुख यांच्या वतीने बळीपूजनाच्या शुभदिनी प्रभागातील घन्टागाडी कर्मचारी, सफाई कामगार, कचरा संकलन गाडी कर्मचारी तसेच विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांचा औक्षण करून सन्मान करण्यात आला.यावेळी कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक टोपी व शेला परिधान करून दिवाळी फराळ आणि दिवाळी भेट देण्यात आली. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारे, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे आणि शहरातील नागरिकांच्या सुविधांसाठी सदैव कार्यरत असणारे हे कर्मचारी खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत, ही भावना या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली.
समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कष्टकरी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवशी सन्मानाने घरी बोलावून त्यांचे औक्षण करणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांना आपलेपणाची वागणूक देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.“श्रम करणारा प्रत्येक हात सन्मानास पात्र आहे. माणसाची प्रतिष्ठा त्याच्या पदावरून नव्हे, तर त्याच्या कष्टावरून ठरली पाहिजे,” हा सामाजिक समतेचा आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.या प्रसंगी नगरसेविका सौ. शिल्पा सुधीर देशमुख व समाजसेवक सुधीर देशमुख यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



