पुसद येथे आठव्या सामूहिक ग्रामगीता पारायणाची सांगता; गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम

पुसद : मानवतेचे महान पुजारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथराज ‘ग्रामगीते’चा घरोघरी प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने ५१ सामूहिक ग्रामगीता पारायणाचा संकल्प श्री गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा पुसद व स्वाध्याय माऊली भवन, अमरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने समन्वयाचार्य, हभप विठ्ठल महाराज भोयर यांच्या विशेष प्रयत्नातून दर महिन्याला राबविण्यात येत आहे. एकूण ५१ पैकी आठव्या सामूहिक ग्रामगीता पारायणाची सांगता आज शुक्रवारी (दि २०) करण्यात आली.
शहरालगतच्या श्रीरामपूर येथील अमर नगरातील हनुमान मंदिर सभागृहात १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित या ग्रामगीता पारायण सप्ताहात दररोज सकाळी ११ ते २ या वेळेत हभप तथा समन्वयाचार्य विठ्ठल महाराज भोयर, गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, प्रचार प्रमुख राजेंद्र काळबांडे, ज्ञानेश्वर ताकतोडे, बाबासाहेब वाघमारे, सम्राट वाघमारे, महिला प्रतिनिधी मंगला पंडित, कल्पना भोयर, मीनाताई वानखेडे, भीमराव वानखेडे, पुष्पाताई भलगे, कांताबाई अनखुळे, गायत्री भेंडे, सुवर्णा गावखंडे, गोपाल गावखंडे, आदींनी सक्रीय सहभाग नोंदविला.
समारोपीय कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, राजेंद्र काळबांडे, मंगला पंडित, कल्पना भोयर आदींनी समयोचित विचार मांडून गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना व सामुहिक ग्रामगीता पारायण उपक्रमांत सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ अनुयायी ज्ञानेश्वर ताकतोडे यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नववे सामूहिक ग्रामगीता पारायण डिसेंबरमध्ये होणार असल्याची माहिती विठ्ठल महाराज भोयर यांनी दिली.



