शिक्षकाचा वाढदिवस अन् दिवाळी सण विद्यार्थ्यांसमवेत साजरा! सावरगाव बंगला येथील जि.प.शाळेत अनोखा संगम

पुसद :सावरगाव बंगला येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. शाळेचे लाडके मुख्याध्यापक मनोज रामधनी यांचा वाढदिवस आणि प्रकाशाचा सण असणारी दिवाळी या दोन्हीचा दुग्धशर्करा योग साधत विद्यार्थ्यांनी हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला.
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना कोणतीही कल्पना न देता दिवाळी या सणाच्या सरप्राइज कार्यक्रमाचे रविवारी(ता.८)आयोजन करुन श्री.रामधनी यांना सपत्निक व सर्व शिक्षकांना शाळेत बोलावले.सकाळी शिक्षक शाळेत येताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ गात त्यांचे स्वागत केले. वर्गाची सजावट आकर्षक रांगोळी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी करण्यात आली होती.
सामाजिक भान आणि पर्यावरणपूरक संदेश
केवळ केक कापून व फटाके फोडून वाढदिवस साजरा न करता, या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी रामधनी सरांच्या हस्ते शाळेच्या आवारात एक वृक्षारोपण केले. तसेच, सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत असणार्या त्यांच्या पत्नी ममता जयस्वाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ भेट म्हणून दिला. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांची ही प्रत्यक्ष पावतीच होती.
फराळाची मेजवानी अन् कृतज्ञता
या वेळी केक कापण्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या फराळाचा (लाडू, चिवडा, करंजी) आस्वाद घेतला. काही विद्यार्थ्यांनी सरांबद्दल असणारा आदर आणि कृतज्ञता आपल्या मनोगतातून आणि कवितांमधून व्यक्त केली. यावेळी शालेय पोषण आहार स्वयंपाकी मुक्ताबाई आटपटकर यांना साडी,चोळी वाढदिवसानिमित्त भेट देऊन शाळेतील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सदस्य साहेबराव साखरे,बाळासाहेब वाळले,श्री.गोरे आदी सदस्यांनी मुख्याध्यापकांचे शाल,श्रीफळ देऊन सदिच्छा दिल्या व या उपक्रमाचे कौतुक केले. संपूर्ण परिसरात या अनोख्या आणि आदर्श सोहळ्याची मोठी चर्चा होत आहे. विद्यार्थ्यांचे हे अथांग प्रेम पाहून श्री. रामधनी यावेळी अत्यंत भावुक झाले होते. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी धिरज आडे, केंद्र समन्वयक करुणा काळे—चुकेकर यांनी कौतुक केले.
मुख्याध्यापक जि.प.के.उ.प्राथ.शाळा,सावरगाव (बंगला),ता.पुसद
: “माझ्या आयुष्यातील हा सर्वात संस्मरणीय वाढदिवस आणि दिवाळी आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून अनाथ मुलांना मदत केली, यातच माझ्या शिक्षणाचे खरे सार्थक झाले,” अशा शब्दांत रामधनी सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.



