पुसदच्या मोक्षधाममध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारांची यशोगाथा ;६ वर्षांत १५०० हून अधिक पार्थिवांना ‘गोकाष्ठा’चा अग्नी

पुसद : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पुसद येथील मानव सेवा समितीद्वारे संचालित मोक्षधाममध्ये गेल्या सहा वर्षांपासून गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोकाष्ठांच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. ५ जून २०२० रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाली असून, या कालावधीत १५०० हून अधिक पार्थिवांवर गोकाष्ठांच्या माध्यमातून अंत्यविधी करण्यात आले आहेत.परंपरागत अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाची आवश्यकता भासते. साधारणपणे एका अंत्यविधीसाठी कमीत कमी ४०० किलो लाकूड लागते. त्या तुलनेत गोकाष्ठांच्या वापरामुळे गेल्या सहा वर्षांत अंदाजे ६ लाख किलो अर्थात ६०० टन लाकडाची बचत झाली आहे. परिणामी हजारो झाडे तोडण्यापासून वाचली असून पर्यावरण संरक्षणाला मोठी मदत झाली आहे. तसेच लाकडाच्या तुलनेत गोकाष्ठांमुळे होणारे वायुप्रदूषणही कमी असल्याने हा पर्याय अधिक पर्यावरणपूरक ठरत आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात सुरू झालेला हा उपक्रम आज पुसद परिसरात व्यापक प्रमाणावर स्वीकारला जात आहे. सुरुवातीला काही प्रमाणात संकोच असला तरी मानव सेवा समिती तसेच गो वृक्ष संवर्धन समिती यांनी केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये या पद्धतीबाबत विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे स्वखुशीने गोकाष्ठांवर अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत.या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्थानिक गोशाळांसह गो पालकांना मिळणारे आर्थिक बळ. गोकाष्ठ निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात गायीचे शेण खरेदी केले जात असल्याने त्यांना उत्पन्नाचा स्थिर स्रोत उपलब्ध झाला आहे. याशिवाय गोकाष्ठ तयार करण्याच्या प्रक्रियेत अनेकांना रोजगाराची संधीही मिळाली आहे.पर्यावरण संवर्धन, गोसंवर्धन आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम पुसद शहरासाठी आदर्श ठरत असून, १५०० हून अधिक अंत्यविधींचा टप्पा हा पुसदकरांच्या पर्यावरण जागरूकतेचा आणि मानव सेवा समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची भावना समितीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. उपक्रम यशस्वीते साठी मानव सेवा समितीचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, उपाध्यक्ष राजुसेठ हिराणी,सचिव बिपीन चिद्धरवार, कोशाध्यक्ष -डॉ. प्रफुल्ल पद्मावार सहसचिव-ललीत सेता,प्रसिद्धी प्रमुख रवींद्र देशपांडे,अॅड. अशोक महामुने, डॉ टी. एन. बूब, सदस्य-शरद मैन्द,राधेश्यामजी जांगीड,गिरीष अग्रवालडॉ. उमेश रेवणचार,संजय बजाज,प्रविण विठ्ठलानी,तुकाराम बिडवई,बिहारीलाल बियाणी,अनिल ग्यानचंदाणी,डॉ. संजय भांगडे, व्यवस्थापक प्रभाकर ढोणे, कर्मचारी सुभाष पांढरे, वाहन चालक साहेबरावं सातपुते, यांच्या सह गो वृक्ष संवर्धन समिती चे श्याम सेठ ग्यानचंदानी, डॉ. पंकज जयस्वाल,पवन बोजेवार, रुपेश येरावार,सचिन गडदे,हरीश चौधरी,शंकर पांडे,अनिल पांडे,कौस्तुभ धुमाले, अशोक आसवानी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.



