सामाजिक

पुसद शहरात राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पालखीचे जल्लोषात स्वागत! राष्ट्रसंतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे – गोपाल कडू यांचे प्रतिपादन!      

पुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचार जर घराघरांत पोहोचले आणि आचरणात आणले, तर खऱ्या अर्थाने ग्रामविकास साकार होईल. सामुदायिक प्रार्थना, ध्यान, कीर्तन, भजन, प्रवचन व वाड.मयाद्वारे महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हेच पालखी प्रचार यात्रेचे उद्दीष्ट असून ग्रामोद्धाराचा खरा विचार देणारा ‘ग्रामगीता’ ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा महाराजांना चंद्रभागेच्या तीरावरच मिळाली असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, मोझरी येथील केंद्रीय प्रचार विभागाचे प्रचार प्रमुख तथा पालखी संयोजक गोपाल कडू यांनी येथे केले.

   आषाढी एकादशीनिमित्त गुरुकुंज आश्रम मोझरी (जि. अमरावती) येथून राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पालखीसह पंढरपूर प्रचार यात्रा मंगळवारी (ता. २१) पुसद नगरीत येताच ‘जय गुरुदेव’, ‘वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय’, ‘ भारत माता की जय ‘ आदी गगनभेदी जयघोषाने परिसर दणाणून गेला. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालखीचे आगमन होताच गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी स्वागताप्रीत्यर्थ स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, शनी मंदिर मार्गे विरंगुळा केंद्रापर्यंत भगवे झेंडे असलेली मोटरसायकल रॅली काढून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

   त्यानंतर स्थानिक विरंगुळा केंद्रात पालखी स्वागताचा सोहळा रंगला. प्रारंभी तुकडोजी महाराजांच्या पादुकांचे पूजन, माल्यार्पण करून महाआरती करण्यात आली.

    यावेळी मंचावर पालखी व्यवस्थापक डॉ. ज्ञानेश्वर मुडे, माजी आमदार ॲड नीलय नाईक, कृषीभूषण दीपक आसेगावकर, नीलेश महाराज गावंडे, बाबाराव पेशवे, ॲड अशोक महामुने, श्याम जोशी, अनिरुद्ध पाटील, निळकंठ पाटील, संदीप जिल्हेवार आदी उपस्थित होते.

   याप्रसंगी ॲड निलय नाईक, दीपक आसेगावकर व नीलेश महाराज गावंडे आदींनी समयोचित विचार मांडून पालखीचे स्वागत करीत गुरुदेव सेवा मंडळ, पुसद तालुका शाखेच्या कार्याचे कौतुक केले.

    यावेळी गुरूकुंज आश्रम, मोझरी येथून पालखी सोबत सेवा देणाऱ्या १३ गुरुदेव अनुयायांचा गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

    प्रास्ताविक गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे यांनी केले. सूत्रसंचालन यशवंत देशमुख यांनी तर प्रा नंदकुमार खैरे यांनी आभार मानले. राष्ट्रवंदना, जयघोष व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी चरण पादुका दर्शनासाठी पुसद, उमरखेड, महागाव व माहूर तालुक्यातील महिला व पुरुषांची मोठी गर्दी झाली.

       पालखी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, सचिव ॲड गजानन साखरे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरडकर, प्रचार प्रमुख राजेंद्र काळबांडे, भजन प्रमुख माधवराव जाधव, नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, ज्ञानेश्वर ताकतोडे, डॉ शरद राऊत, किसन गरडे, मनोज गाढवे, विठ्ठल येवले, राजू पुरी, रमेश सरागे, मधुकर अजमिरे, प्रा नरेंद्र खैरे, वसंत ढोणे, प्रशांत आत्राम, बाळू परतवार, ज्ञानेश्वर लंघडे, मारोती सरगर, गजानन जाधव, पंजाब ढेकळे, गजानन बागल, सुधाकर हुडेकर, संभाजी टेटर, प्रशांत गावंडे, सौरभ कदम, रमेश बोरकर, पांडुरंग बुरकुले, यशवंत भगत, पुंडलिक भालेराव, संभाजी बळी, महिला प्रतिनिधी छाया लामणे, माया काळबांडे, पुष्पा खैरे, संध्या पवार, माधुरी वांझाळ, जया मोरे आदींनी परिश्रम घेतले.

 

  वृक्षारोपण उपक्रम व आरोग्य शिबिराला प्रतिसाद.. 

     राष्ट्रसंतांच्या पालखी प्रचार यात्रेनिमित्त अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून पुसद गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने विरंगुळा केंद्राच्या परिसरात प्रचार प्रमुख गोपाल कडू यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

    तसेच रोटरी क्लब ऑफ पुसद व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमस्थळी सकाळी ९:३० ते १०:३० या कालावधीत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह व रक्तदाब चाचणी करण्यात आली. डॉ. राजेश चव्हाण, डॉ मंगला चव्हाण यांनी मोफत सेवा देऊन तब्बल दीडशे रुग्णांची तपासणी केली . मात्र, विशेष बाब अशी की, काही अपवाद वगळता या सेवाधाऱ्यांची रक्त शर्करा व रक्तदाब योग्य आढळला. सामुदायिक प्रार्थना आणि ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणे, याचा हा परिणाम असल्याचे प्रचार प्रमुख गोपाल कडू म्हणाले. तर या शिबिरासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय ठाकरे, सचिव अश्विन आडे, श्रीराम पद्मावार, डॉ उमेश रेवणवार, प्रा डॉ रविंद्र मडावी आदींनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close