शैक्षणिक

श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा साजरा! ‘विद्यार्थ्यांनो उच्च ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नाची पराकाष्टा करा- अश्विनीताई पाटील चोंढीकर!

पुसद: श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये शालेय उपक्रमाबरोबर विविध प्रकारच्या सहशालेय उपक्रमात व स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या २९० विद्यार्थ्यांचा एकत्रित सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदच्या सचिव तथा गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या संचालक अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर होत्या. प्रसंगी प्राचार्य रामचंद्र हिरवे, उपप्राचार्य दत्तात्रय जीवने, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सचिन नालींदे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयाचा शैक्षणिक वारसा पुढे नेत असताना ज्या विश्वासाने पालकांनी आमच्या शाळेत विद्यार्थी पाठवले आहेत, तो विश्वास पूर्णत्वास नेण्यासाठी दर्जेदार शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा सदैव आयोजित केल्या जातात व त्यामधून विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि नवी प्रेरणा मिळण्यासाठी आजच्या सन्मान सोहळ्यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

अध्यक्ष स्थानावरून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना अश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये निसर्गतः मिळालेल्या बुद्धीचा योग्य वापर करून तिला चालना दिल्यास विद्यार्थी यशोशिखराकडे वाटचाल करण्यासाठी तयार होतात. त्यासाठी विद्यार्थ्यांंनी जिद्द, चिकाटी निरंतर अभ्यास या गुणांची पराकाष्टा करावी, आमचे शिक्षक सदैव आपल्या पाल्याचे हित जपण्यास कटिबद्ध आहेत.

त्यासाठी पालकांनी योग्य सहकार्य करावे असे मौलिक विचार व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयात घेण्यात आलेल्या प्रत्येक विषयातील ऑलिंपियाड परीक्षा/स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तदवत्तच गणित संबोध परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभाग, क्रीडा स्पर्धेतील तालुका व जिल्हा स्तरावरील विजयी विद्यार्थी, चित्रकला स्पर्धा, कलारत्न याबरोबरच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथील राष्ट्रीय सेवा योजनेतील कु. छकुली मांगीलाल पवार विभागस्तरीय आदर्श स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त व विभागीय शिबिरासाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा संबंधित विषय शिक्षकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सारंग कोरटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक प्रा. असिफ शेख ,सचिन नालींदे, यासह मंगेश जाधव ,अविनाश देशमुख, गजाभाऊ भगत, प्रा भाऊसाहेब देशमुख, महेंद्र अंबुरे, लता सुरोशे, प्रा.नीता खराटे, प्रणिता मंदाडे, वृषाली खैरे , प्रा.योगिता काष्टे, सारिका जाधव जयश्री आसोले यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पालक, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close