भाजपाचे माजी आमदार पुसद जिल्हा निवडणूक प्रमुख ॲड.निलय नाईक यांचा व्हायरल बातमी संदर्भात पत्रकार परिषदेत खुलासा!

पुसद:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, शहरातील अनेक भागात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालं आहे. भाजपमधील इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यावर दबक्या आवाजात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडताना डमी उमेदवार दिल्याचा पक्षश्रेष्ठीवर मोठा आरोप केला जात आहे.आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी नाईक यांना मागील बाजूने मदत होईल या हेतूने किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी मतदान करण्याची मागणी केल्याची बातमी व्हायरल झाल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार पुसद जिल्हा निवडणूक प्रमुख ॲड.निलय नाईक यांनी दि. २२ रोजी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांच्या निवासस्थानी भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नामनिर्देशनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी उपविभागीय कार्यालयासमोर बोललेला व्हिडीओ एडिट करुन व्हायरल करण्यात आला. खरे पाहता मोहिनी नाईक ही मुलगी आहे असे मी नेहमीच म्हणतो. एका राकाँच्या कार्यकर्त्याला बोलतांना तुम्ही मोहिनीलाच मतदान करा अन्यथा इतराला कराल असे बोलल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. खरे पाहता माझ्या पोटात एक आणि ओठात एक असे कधीच झाले नाही. मी मनोहरराव नाईक व इंद्रनिल नाईक यांच्या विरोधात विधानसभा लढविली आहे. खुलेआम मी विरोधात राहिलो आहे असे पत्रकार परिषदेत माजी आ. निलय नाईक यांनी स्पष्ट केले.
भाजपा जिल्हाध्यक्षा आरतीताई फुपाटे यांनी युतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, राकाँ सोबत युती करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु अध्यक्ष पदावरुन युती झाली नाही, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक असल्यामुळे युतीबाबत तुम्ही निर्णय घ्या असे सांगितले. त्यामुळे युती झाली नाही. स्वबळावर नगराध्यक्षासह नगरसेवक पदासाठी आम्ही उमेदवार दिले. या निवडणुकीत निश्चितपणे पुसद न. प. वर भाजपाचा झेंडा फडकेल असे जिल्हाध्यक्षा डॉ. आरतीताई फुपाटे यांनी ठासून सांगितले. अध्यक्षीय उमेदवार निखिल चिद्दरवार यांना नगर पालिकेमधील खडान खडा माहिती आहे. एक पॉवरफुल उमेदवार म्हणुन आम्ही त्यांना उमेदवारी दिली असे त्या म्हणाल्या ४० कोटींची कामे केलीःॲड. निलय नाईक विधान परिषदेचे सदस्य असतांना राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार होते. त्यांच्या माध्यमातून पुसद नगर पालिकेमध्ये ४० कोटींचा निधी आणुन विकास कामे केली. परंतु कोविड काळात काँग्रेसचे सरकार असतांना एक दमडा सुध्दा आणला नाही. आता काँग्रेसवाले विकासाच्या गप्पा करतात. पुढेही आम्ही कोट्यावधींचा निधी विकास कामासाठी आणु असे माजी आ. निलय नाईक म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्यान े इंद्रनिल नाईक विजयी झाले. आमदारकी तुम्हाला तर नगराध्यक्षपद आम्हाला द्या अशी त्यांना विनंती केली. परंतु त्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ सतत ठेवून ऐनवेळी मोहिनी नाईक यांना नगराध्यक्ष म्हणुन उमेदवारी दिली. डॉ.आरतीताई फुपाटे यांच्या नेतृत्वात स्वबळावर भाजपा निवडणूक घेण्यात लढण्याचा निर्णय घेण्यात आला.आणी आमची सर्व टिम सक्षमपणे काम करीत आहे. लाडकी बहिण योजना, घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या सरकारने मंजूर केला. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असतांना त्यांनी चिद्दरवार यांच्या वार्डात २ कोटीचा निधी दिला. भविष्यात पुसद शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात खेचून आणणार आहे. विकास व हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही लढाई निश्चिंतपणे जिंकू. यासाठी जनतेचे आशिर्वाद द्यावे असे शेवटी ते म्हणाले. पत्रकार परिषदेचे संचलन ओमप्रकाश शिंदे यांनी केले. पत्रकार परिषदेत भाजपा उपाजिल्हाध्यक्ष अनिरुध्द पाटील चोंढीकर, नगराध्यक्षीय उमेदवार निखिल चिद्दरवार, शहर अध्यक्ष निलेश पेन्शनवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, धनंजय अत्रे, योगेश राजे, महेश नाईक, ॲड. आदित्य माने, निळकंठ पाटील, पंजाब भोयर, संतोष आर्य, सुरज कुरील, प्रतिक पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते



