राजकिय

नगर पालिकेचे धोरण कागदावर अन्‌ फेरीवाले रस्त्यावर;२०१४ चा फेरीवाला कायदा लागू करा -ॲड.सचिन नाईक, पुसद नगर पालिकेचा ‘अतिक्रमण हटाव’चा फार्स ; कारवाई फक्त गरिबांवरच? धनाढ्यांच्या महाकाय अतिक्रमणांना अभय कां.?

पुसद :शहरात गेल्या काही दिवसांपासून नगर पालिकेच्या नगरध्यक्षा सौ.मोहीनीताई नाईक यांनी शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा चंग बांधला असून, त्यांनी मोहिमेत ढिलाई दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जागेवरच धारेवर धरले. परंतु, ही धडक मोहीम केवळ एकीकडे हातावर पोट असणाऱ्यांवर बडगा उगारला जात असताना, शहरातील बड्या आणि धनाढ्यांच्या आलिशान अतिक्रमणांना मात्र प्रशासनाकडून हेतुपरस्पर अभय दिले जात आहे त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.नगर पालिकेकडून फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात स्थानिक काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आक्रमक झाले आहेत. नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेची ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत पालिका क्षेत्रात ‘फेरीवाला (पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४’ लागू करण्याची मागणी केली आहे.

 याबाबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲड.सचिन नाईक यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सहकारी पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. सध्या नगर पालिकेकडून फेरीवाल्यांवर करण्यात येणारी कारवाई ही संबंधित २०१४च्या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून होत असल्याचे त्यांनी सांगितले. फेरीवाले हे शहराच्या अर्थचक्राचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. मात्र, नियमनाऐवजी सरसकट कारवाई केल्यामुळे त्यांच्या रोजगारावर गदा येत असल्याचे निवेदनात नमूद केले. त्यामुळे नगर पालिका हद्दीत फेरीवाला कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.मात्र, नगर पालिकेची ही मोहीम आता तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, “प्रशासन फक्त गरिबांचेच संसार रस्त्यावर आणत आहे का?” असा गंभीर आरोप पुसदकरांकडून केला जात आहे. एकीकडे हातावर पोट असणाऱ्यांवर बडगा उगारला जात असताना, शहरातील बड्या धनाढ्यांच्या आलिशान अतिक्रमणांना मात्र प्रशासनाकडून हेतुपरस्पर अभय दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नगराध्यक्षा रस्त्यावर, पण कारवाईत दुजाभाव का?

नगरध्यक्षा सौ.मोहिनी ताई नाईक यांनी शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा चंग बांधला असून, त्यांनी मोहिमेत ढिलाई दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जागेवरच धारेवर धरले. परंतु, ही धडक मोहीम केवळ गरीब आणि सर्वसामान्य व्यापाऱ्यांपुरतीच मर्यादित का? असा संतप्त सूर उमटत आहे. शहरातील अनेक मुख्य चौक आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मोठ्या राजकारण्यांच्या, उद्योजकांच्या आणि धनाढ्य व्यवसायिकांच्या इमारतींनी रस्त्यांच्या सीमा ओलांडल्या आहेत. अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागांवर बेकायदेशीर बांधकामे आणि हॉल थाटले गेले आहेत. मात्र, या मोठ्या माशांवर कारवाई करण्याचे धाडस मात्र नगरपालिका प्रशासनात दिसत नाही ना लोकप्रतिनिधींमध्ये. त्यामुळे ही मोहीम केवळ सामान्य जनतेचा छळ करण्यासाठीच राबवली जात आहे कां?, अशी शंका उपस्थित होत आहे.

गरिबांच्या पोटावर पाय; पण धनदांडग्यांना सवलत..!

अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला आणि गरीब नागरिक आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी रस्त्या कडेला लहान-मोठ्या टपऱ्या किंवा खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नगर पालीकेने त्यांना हक्काची पर्यायी जागा उपलब्ध करून न देता थेट रस्त्यावर उतरून त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, ज्या बड्या लोकांच्या अतिक्रमणामुळे शहरात खरी वाहतूक कोंडी होते, त्यांना साधी नोटीस बजावण्याचीही हिंमत नगरपालिका प्रशासन दाखवत नाही. राजकीय दबावापोटी किंवा आर्थिक हितसंबंधांमुळे या बड्या लोकांच्या बेकायदेशीर बांधकामांकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात असल्याची उघड चर्चा आता चौकाचौकात सुरू झाली आहे.नियम सर्वांसाठी सारखेच ठेवा, नगराध्यक्षांच्या या एकतर्फी कारवाईमुळे पुसद शहराच्या नागरिकांमध्ये आणि फेरीवाले छोट्या व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “जर कायदा आणि नियम सर्वांसाठी समान असतील, तर सर्वात आधी शहरातील बड्या उद्योगपतींची आणि राजकीय नेत्यांची अतिक्रमणे का काढली जात नाहीत?” असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ गरिबांच्या टपऱ्या तोडून शहर अतिक्रमण मुक्त होणार नाही, तर त्यासाठी शहरातील मोठ्या बांधकामांवरही बुलडोझर चालवा असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारु लागले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने जनहिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.सचिन नाईक, रा. का.नगरसेवक ॲड. भारत जाधव,शिवसेनेचे मोहन विशवकर्मा,सय्यद इस्ती्यक काँ.प्रदेश अल्प. माहासचिव, नगरसेवक ॲड. वसीम अहेमद, शहराध्यक्ष झिया शेख, विजय बाबर,तहेसीन खान,गाझी उसामा, फिरोज खान,प्रकाश नेमायते,तसेच फळ व भाजी विक्रेते,  तसेंच रास्ता किरकोळ विक्रेते संघांचे अकील बागवान, तसलीम खान,प्रेम गोवर्षेट्टीवर, गजानन गायकवाड, दशरत जवादे,मोहम्मद फारूक, सौ.अरुणा उमाकांत पांडे,अमन खान,विलास जाधव यांच्या या निवेदनावर स्वक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close