ईतर

आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच येथुन निघुन जातो-प्रा.गणेश शिंदे!माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यान पुष्प!

पुसद: येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त २६ वे स्मृती व्याख्यान पुष्प दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री शिवाजी विद्यालयाचे देवराव पाटील सभागृहात उत्साहात पार पडले. जीवन सुंदर आहे या विषयावर प्रा. गणेश शिंदे पुणे यांनी विचारमंथन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.ॲड. निलय नाईक होते तर विचारपीठावर माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, शहराच्या प्रथम नागरिक गराध्यक्षा सौ. मोहिनी नाईक प्राचार्य डॉ. उत्तमराव रुद्रावार, दीपक आसेगांवकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुध्द विजयराव पाटील चोंढीकर संस्थेच्या सचिव सौ. अश्विनी पाटील चोंढीकर, उपनगराध्यक्षा सौ. अर्चना राजेंद्र जगताप, ॲड. जीवनराव पाटील प्रा.गोविंदराव फुके, सुधाकरराव ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलनाने छत्रपती शिवाजी महाराज, कै. सुधाकरराव नाईक, कै. देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी माजी आमदार ॲड. निलय नाईक व वक्ते प्रा.गणेश शिंदे यांचा अनिरुध्द पाटील चोंढीकर यांनी शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर नगराध्यक्षा सौ.मोहिनीताई नाईक यांचा सुद्धा शाल, श्रीफळ देऊन संस्थेचे सचिव सौ.अश्विनी पाटील चोंढीकर यांनी सत्कार केला. विदर्भ साहित्य संघातर्फे माजी आ. विजयराव पाटील चोंढीकर,सर्वश्री दीपक आसेगांवकर, सुधाकरराव ठाकरे, प्रा. गोंविदराव फुके यांचा शाल, श्रीफळ देऊन आणि उत्तम रुद्रावार सर यांचा विशेष कौटुंबिक सत्कार करण्यात सत्कार करण्यात आला.

कै.देवराव पाटील यांचा स्मृतीदिन ३९ वर्षापासुन श्री शिवाजी शिक्षण संस्था व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसदच्या वतीने साजरा करण्यात आला.गेल्या २६ वर्षापासुन कै. सुधाकरराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात येते. या दोन्ही कार्यक्रमासाठी प्राचार्य उत्तम रुद्रावार व्याख्यानमाला घेण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याबद्दल माजी आ. विजय पाटील चोंढीकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. विदर्भ साहित्य संघाचे सचिव सुधाकर ठाकरे यांनी कै. सुधाकरराव नाईक यांच्या संस्मरणीय कारकिर्दीचा लेखाजोखा सांगितला त्याचबरोबर वक्ते प्रा. गणेश शिंदे यांचाही परिचय करुन दिला.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून ॲड.निलय नाईक बोलताना माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांनी कॅबिनेट मंत्री व मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी निर्णय घेतले विशेषतः जलसंधारणाबाबत त्यांनी जे कार्य केले ते राज्यात नव्हे तर देशात त्याचे अनुकरण करत आहेत. त्याचबरोबर मुंबई येथील गुंडगिरी संपविण्याचे त्यांनी काम केले. तसेच खाजगी विनाअनुदान तत्वावर अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय सुरु करुन महाराष्ट्रातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळवुन दिली. त्यांच्या कार्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जलसंधारण दिन २१ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्याचा निर्णय घेतला म्हणाले. ते पुढे म्हणाले, नाईक घराणे व चोंढीकर घराणे यांचे संबंध अनेक पिढ्यांपासुन आहेत. ते संबंध पुढेही आम्ही जोपासण्याचे काम केले. जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी मला खऱ्या अर्थाने विजयअण्णांमुळेच मिळाली. त्यांनी सुधाकरराव नाईक यांना माझे नाव सुचविले अन्यथा मला पंचायत समितीचे उपसभापती, सभापती नंतर जिल्हा परिषद सभापती असे होत होत अध्यक्षपदाच्या सिडीपर्यंत पोहचता आले तत्कालीन प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव पाटील, कै. जवारलाल दर्डा, मनोहरराव नाईक व विजयराव पाटील चोंढीकर यांच्यामुळेच जि. प. अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. सुधाकरराव नाईक यांनी माझ्या सह महाराष्ट्रातील ३१ जि. प. अध्यक्षांना लालदिवा देऊन उपमंत्र्याचा दर्जा दिला होता असे ते म्हणाले.

 तर कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ते प्रा. गणेश शिंदे यांनी बोलताना म्हणाले की मी येथे व्याख्यानाला आलो नाही तर तुमच्याशी चर्चा करायला आलो पण आमचा आनंदही उरलेला नाही आणि आमच दुःखही आमच राहिलेल नाही. खरे तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपले आहे. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच येथुन निघुन जातो. त्यासाठी सतत आनंदी राहा आपल्याला जे मिळालं आहे ते आपलं आहे यातच आनंद माना यातच आपले जीवन सुंदर आहे असे प्रा. गणेश शिंदे आपल्या व्याख्यानात म्हणाले. ते पुढे म्हणाले, आपण छोट्या छोट्या बाबीवरुन निराश होतो. आपल्या पेक्षा शेजाऱ्यांने मोठा बंगला बांधला तर त्याचे दुःख आपल्याला होते. अशा बाबींवर दुःख न मानता आनंदात राहणे गरजेचे आहे. आमचं प्रश्न टप्याटप्या नुसार वयाच्या टप्प्यानुसार बदलत जातात आणि आयुष्य इथ पासून इथ पर्यंत कधी येऊन पोहचलं ते आपल्याला समजतं नाही. देव किती सुंदर आहे. जन्माला येण्याचं संकेत ९ महिन्या आधी देतो, जाण्याचे संकेत ९ मिनिट आधी मिळत नाहीत. कोणीतरी जन्माला येणार आहे हे ९ महिने आधी कळतं पण आपण जाणार आहोत असा निरोप जर ९ महिने आधी आला असता तर काय परिस्थिती होईल.निसर्गाचा दुसरा नियम आहे. येताना काही घेऊन यायचं नाही आणि जातांनाही काही घेऊन जायचं नाही. असे असतांना मनुष्याला एवढा गर्व का त्यासाठी सर्वांवर प्रेम करा असे ते म्हणाले. ताऱ्यांकडे बघा आपल्या चेहऱ्यावर एक स्मित आलं पाहिजे की आम्ही आमच्या वस्तीत, आम्ही आमच्या धुंदीत जगलो. सुंदर आयुष्य जगलो आणि आपलं कौतुक किमान आपल्याला वाटलं. जगाला कौतुक वाटेल की नाही याची खात्री नाही.आणि जो कोणी चांगल काम करत असेल तर त्याचं कौतुक करायला मागे पाहच नका. कौतुक करीत असतांना त्या माणसाचे दोषही सांगायचे असतात. दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे चारचौघात करायचं असतं. आपण उलट करतो. आपण चारचौघात ईज्जत काढतो आणि कौतुक कानात करतो. शब्द जपुन वापरा. नाही पटलं तर मौन पाळा. काही निर्णय नियतीवर सोडा. काही निर्णय नियमांवर सोडून द्या. प्रत्येक संकटाला दगड मारत बसु नका. काही ठिकाणी दोन पावले मागे घ्या. यामुळे आपलं आयुष्य सुंदर करता येईल याची काळजी घ्यावी. गाढव हसतांना बघितल ? ज्या दिवशी गाढव हसायला सुरु करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवाकडे सुरु झाला. आणि ज्या दिवशी माणुस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास गाढवाकडे सुरु झाला असे शेवटी म्हणत व्याख्यानाचा शेवट प्रा. गणेश शिंदे यांनी केला. कार्यक्रमाचे संचलन प्रा. गजानन जाधव यांनी केले तर आभार प्रा. गोविंद फुके यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शिक्षक कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close