आचारसंहिता असूनही नेतेमंडळी बॅनरवरच : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष!

पुसद : प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीचीरणधुमाळी सुरू असुन सध्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने आदर्श आचारसंहिता पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकते. आवश्यक असल्यास फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. नियमांचे उल्लंघन करणार्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नोव्हेंबर रोजी ४:०० वाजता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा केली होती. तेव्हापासून आचारसंहितेचा अंमल सुरू आहे. यादरम्यान पुसद शहरात हजारो जाहिरातींचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज राजकीय बॅनर, पोस्टर, फलके हटविल्याचा दावा नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात येत आहे. तरीही काही राजकीय फलक आदर्श आचारसंहितेचा सुरू असतानाही कायम आहेत.
आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही फलक लावण्यास व राजकीय नेत्यांची छायाचित्रे देखील लावण्यास मनाई आहे किंबहुना आयोगाच्या पत्राकानुसार शासनाच्या सर्व संकेतस्थळांवरून राजकीय नेत्यांची छायाचित्रे देखील काढण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. आयोग यासाठी आग्रही अन् गंभीर आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन राजकीय बॅनर, पोस्टर हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने दर्शनी भागातील राजकीय फलक काढण्याचे काम केले. तरीही आजही शहरातील मुख्य रस्त्यावरील चौका-चौकात विद्युत विभागाच्या खांबावर बस स्थानकाच्या वॉल कंपाऊंडच्या आत जागोजागी राजकीय पक्षांचे फलक ‘जैसे थे’च आहेत. मात्र, त्याचदरम्यान शहरातील बहुतेक भागांत सत्ता पक्षाचे ही मोठे मोठे होर्डिंग उभे असल्याने याच्या विरोधात व शासनाच्या विरुद्ध नागरिकात रोष पाहावयास मिळत आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९८५ नुसार शहरातील सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज लावण्यास परवानगी नाही. तर नगर परिषदेेे काही शुल्क भरून काही राजकीय पक्षांनी परवानगी एकाा जागेची घेतली आणि दुसऱ्या जागेवर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील चौका चौकात शासकीय भिंतीवर, विद्युत विभागाच्या लोखंडी खांबांवर लावण्यात आलेले पोस्टर्स, बस स्टँडच्या वॉल कंपाऊंडच्या आतील बाजूस बॅनर्स व होर्डिंग्ज आचारसंहितेचा काळातही मोठ्या दिमाखात उभे आहेत.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगीने लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज २४ तासांच्या आत न काढल्यास संबंधित यंत्रणेवर पोस्टर्स, बॅनर व होर्डिंग लावल्या प्रकरणी संबंधितांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.



