छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न! माळ पठारावरील सिंचनाचा प्रश्न सुटला नाही तर मंत्रीपद सोडेन: राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भिष्म प्रतिज्ञा!

पुसद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय धिकारी आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनाखाली ३०जुलै२०२६ रोजी पुसद विधानसभा मतदारसंघातील अग्रवाल मंगल कार्यालय येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाले.
नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा ‘एकाच छताखाली, एकाच दिवशी’ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात विविध शासकीय विभागांनी माहिती, मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्रांचे वितरण तसेच विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून दिला.या अभियानात महसूल, पुरवठा, कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य, पंचायत समिती, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सायबर सेल, महावितरण, पशुसंवर्धन, परिवहन, वनविभाग, पंचायत समिती, आदी विभागांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून दिली.या शिबिराला नागरिकांनी भेट देऊन जिवंत सातबारा, महिला शेतकरी प्रमाणपत्र, उत्पन्न, जात, नॉन-क्रिमिलिअर, भूमिहीन, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, रेशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, बचत गट कर्जवाटप, स्वामित्व योजना, कृषी योजनांसह विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ घेतला.
यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला. या अभियानातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, त्यांच्या समस्या तातडीने सोडविणे आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे हा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला. यावेळी सकाळी१०: ०० वाजण्याच्या सुमारात सर्व विभागांच्या स्टॉल वरील कर्मचारी नोंदणी तसेच उपस्थिती नोंदणी करण्यात आली. १० वाजता ह.भ.प. मधुकर महाराज खोडे यांनी व्यसनमुक्ती या विषयावर समाज प्रबोधन केले. ११ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होऊन त्यात प्रमुख अतिथी ना. इंद्रनील नाईक व इतर मान्यवरांचे पीएमश्री नगर परिषद शाळा क्रमांक आठच्या मुलींनी प्रवेशद्वारावर औक्षण करून स्वागत केले.
त्यानंतर जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिळोणा मुलींचे लेझीम पथकाने स्टेज पर्यंत नेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्व वसंतराव नाईक तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मूळ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्याच्या स्वागतासाठी श्री. शिवाजी विद्यालय पुसदच्या मुलींनी स्वागत गीत तसेच निबी जि. प. शाळेतील विद्यार्थीनिनी बंजारा वेशभूशेत बंजारा नृत्य सादर केले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ना. इंद्रनील नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे होते तर उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना म्हणाले, पुसद विधानसभा मतदार संघातील ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील तिसवर्षापासून माळपठारावरील एरिगेशनचा प्रश्न सुटला नाही. मोहिनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली माळपठार कृती समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली. तसेच पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन पाटबंधारे मंत्री ना. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठकीचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माळपठारावरील एरिगेशनचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. याप्रसंगी अधिकाऱ्यांना माळपठारावरील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे असे सक्त निर्देश सुद्धा दिले होते तरीही पुसद मतदार संघातील माळ पठारावरील पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन असेही ना. इंद्रनिल नाईक म्हणाले. ते पुढे म्हणाले, जांबबाजार येथील १४ गावांना पाणी पुरविण्यासाठी नविन योजना मंजुर करण्यात येणार असुन त्यामध्ये येलदरी गावाचाही समावेश करणार असल्याचे ते म्हणाले. मध्यंतरी आमदारांचाही निधी थांबविण्यात आला होता. त्यामुळे कामे करता आली नाही. येथील अधिकाऱ्यांना लवकरच शासकीय निवासस्थान (कॉटर्स) बांधुन देण्यात येतील तर ‘एसआयआर’ प्रक्रियेत कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा असे ते म्हणाले. जनतेची सेवा करण्याची नाईक घराण्याची परंपरा आहे.
तीही पुढे अशीच चालु ठेवणार असे वक्तव्य त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिराच्या आयोजनाच्या वेळी केले. याप्रसंगी नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी या शिबीराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. पुसद तालुक्यातील ९ जि. प. सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात शिबीर घेण्यात आले आहेत. याचा लाभा सर्व नागरिकांनी घ्यावा असे त्या म्हणाल्या. अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्षा डॉ. आरतीताई फुपाटे यांनी या महाराजस्व अभियानाचा फायदा थेट लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विविध योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचाव्या असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार वैभव खाडे, माया ठोके, सी. डी. राठोड, कामराज चौधरी, निलांजन वानखेडे ग्राम महसूल अधिकारी, पुसद तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक सर्व शिपाई, महसूल सेवक यांनी परिश्रम घेतले. ग्राम महसूल अधिकारी वनिता धुळगुंडे व गजानन कवाने यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ असे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली. आभार प्रदर्शन तहसीलदार रेखा वाणी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



