गुरुपौर्णिमा निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पुसद : शहरात रोटरी क्लब ऑफ पुसद, पांचभौतिक आयुर्वेद हॉस्पिटल व श्री स्वामी समर्थ केंद्र सप्तगिरी नगर पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ केंद्र सप्तगिरी नगर पुसद येथे गुरुपौर्णिमा निमित्त विद्धकर्म, अग्निकर्म व पंचकर्म महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ८० हून अधिक रुग्णांची नाडी परीक्षण, उदर परीक्षण, पांचभौतिक चिकित्सा पद्धतीने तपासणी, मोफत औषधोपचार तसेच विविध पंचकर्म उपचार करण्यात आले.
शिबिरामध्ये पांचभौतिक आयुर्वेदचे डॉ. वैद्य अमोल रमेश खांदवे यांनी रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करून विद्धकर्म, अग्निकर्म, नस्य तसेच तात्काळ वेदना कमी करणारे विविध पंचकर्म उपचार केले. अनेक रुग्णांना उपचारानंतर वेदनांमध्ये लक्षणीय आराम मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ. वैद्य अमोल खांदवे यांनी सांगितले की, “आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार, सांधेदुखी, तसेच पोटाचे विकार, आम्लपित्त आणि पचनसंस्थेच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून ही चिंतेची बाब आहे. अशा आजारांमध्ये आयुर्वेद उपचारपद्धती रोगाच्या मूळ कारणावर उपचार करून त्याचे उच्चाटन करण्यास मदत करते. पांचभौतिक आयुर्वेदातील उपचार हे सुरक्षित, दुष्परिणामरहित व परिणामकारक असल्याने नागरिकांनी आयुर्वेदाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री स्वामी समर्थ केंद्र सप्तगिरी नगर चे पदाधिकारी, रोटरी क्लब ऑफ पुसद चे पदाधिकारी, आणि पांचभौतिक आयुर्वेद चे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.



