कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या; पुसद तालुक्यातील भोजला येथील घटना!

पुसद: वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोजला येथील ३५ वर्षीय अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला व नापीकीला कंटाळून स्वतःच्या घरात गळफास घेऊन करून आत्महत्या केली.ही घटना रविवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने ठाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुखदेव रामराव ठाकरे (३५, रा.भोजला) असे मृत अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून, शासनाकडून कर्जमाफी होईल या भोळ्या आशेवर त्याने कर्ज घेतले होते. मात्र शासनाने कर्जमाफीची कोणतीही घोषणा न केल्यामुळे त्यांनी दुसरे कर्ज घेऊन शेतीत लागवड केली. आधीच या कुटुंबाजवळ तुटपुंजी जमीन असून या शेतीवर तिघा चौकाचा संसार उभा आहे शेतीत गत काही वर्षापासून हंगाम चांगला होत नाही त्यामुळे या कुटुंबाला सांभाळण्यासाठी इतरही रोज – मजुरीचे कामे हमाली सुद्धा करावी लागते. त्यातच बँकेचे घेतलेले कर्ज आणि उसनवारीने घेतलेले पैसे परत कसे करायचे, या विवांचनेत राहून पत्नी ही रोज मजुरीचे कामासाठी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेल्याचे पाहून त्यांनी स्वतःच्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची सूत्राची माहिती आहे. वसंत नगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर भोजला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ, पत्नी, दोन मुली असा बराच आप्त परिवार आहे.



