पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धार्मिक स्थळावर विनापरवानगी ने लावलेले भोंगे संबंधित धार्मिक व सामाजिक स्थळांच्या विश्वस्तांनी स्वेच्छेने उतरविले!

पुसद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुसद पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परीसरात सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवरील विनापरवाना लावलेले भोंगे (लाउडस्पीकर्स) काढण्याची मोहीम संबंधित पोलिस हाती घेतली असून त्याच अनुषंगाने पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धार्मिक स्थळ व सामाजिक स्थळांच्या विश्वस्तांची पदाधिकाऱ्यांनी स्वेच्छेने उतरविले.
याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सुत्रांनी झेप न्यूज ला माहिती दिली की,उच्च न्यायालयाच्या क्रिमिनल रिट पिटीशन क्र. ४७२९/२०२१ तसेच पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रक व स्थायी आदेशानुसार ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २०००, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ याअंतर्गत विनापरवाना भोंगे(लाउडस्पीकर्सवर) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व धार्मिक व सामाजिक स्थळांच्या विश्वस्तांच्या बैठका घेऊन आवश्यक ते सूचना देण्यात आल्या होत्या. कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट निर्देश सुध्दा देण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी दि.६एप्रिल२०२६ रोजी खडकदरी गावातील मंदिर, मशीद व बौद्ध विहार या धार्मिक स्थळांवर विनापरवाना लावण्यात आलेले भोंगे संबंधित धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी गावचे पोलीस पाटील दिगंबर चिभडे यांच्या उपस्थितीत या धार्मिक स्थळावर विनापरवानगी ने लावलेले भोंगे (लाऊड स्पीकर)/ संबंधित पदाधिकाऱ्यांनी स्वेच्छेने काढून प्रशासनास सहकार्य केले. सदर ही कारवाई शांततेत व कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पडली.



