नटसम्राट’ हरपला,ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे( वृत्तसेवा):ज्येष्ठ अभिनेते आणि नटसम्राट म्हणून ओळख असलेल्या नाना पाटेकर यांनी आज वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं आज पहाटे गोव्यात त्यांचं निधन झालं आणि निधनानंतर चित्रपटसृष्टीसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार डोणजे येथील त्यांच्या नानाची वाडी या शेतात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.महान कलावंताला अखेरचा निरोप -आपल्या लाडक्या अभिनेत्याला डोळे भरून शेवटचा निरोप देण्यासाठी आणि अंतिम दर्शन घेण्यासाठी डोणजे गावात हजारोंचा जनसमुदाय लोटला होता.
अश्रू ढाळत आणि जड अंतःकरणाने संपूर्ण महाराष्ट्राने या महान कलावंताला अखेरचा निरोप दिला. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार याने त्यांना मुखाग्नी दिला. त्यावेळी ‘नाना पाटेकर अमर रहे’ अशा घोषणा उपस्थित असलेल्यांनी दिल्या.गावात चाहत्यांची गर्दी -गोव्याहून नाना पाटेकरांचे पार्थिव विशेष एअर अॅम्ब्युलन्सद्वारे पुणे विमानतळावर आणण्यात आले. तिथून रस्तेमार्गे पार्थिव त्यांच्या डोणजे येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. नानांच्या निधनाची बातमी पसरताच अवघा महाराष्ट्र हळहळला आणि चाहत्यांनी डोणजे गावाकडे धाव घेतली होती.
मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारं नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला.खरं तर ‘नटसम्राट’ म्हटलं तर, जुन्या पिढीला रंगभूमीवरचे श्रीराम लागू आठवतात. पण, सिनेमे पाहून मोठे झालेल्या पिढीला, जर विचारलं तर मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर रुपेरी पडद्यावर ‘नटसम्राट’ मोठं करणारे नाना पाटेकरच उभे राहतात. 
रंगभूमीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यांच्या नाटकांचा उल्लेख करायचा झाला तर, ‘पुरुष’ मध्ये त्यांनी साकारलेला गुलाबराव आणि ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकात साकारलेला सत्तार अजरामत केलाय. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत १९७८ मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.नाना पाटेकर यांनी ‘गमन’ १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ही भूमिका इतकी छोटी होती की, ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्ष नाना सिनेमात मिळेल ती भूमिका करत राहिले ‘गिद्ध’, ‘भालू’, ‘शीला’ या सिनेमांतही नानांनी काम केलेलं. यांपैकी एकही सिनेमा विशेष कमाई करू शकला नाही. राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आज की आवाज’ सिनेमात नाना पाटकेर सहनायक होते. नानांच्या कामाचं कौतुक झालं, पण सिनेमा काही चालला नाही. नानाची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘अंकुश’ हा सिनेमा. १९८६ मध्ये आलेल्या सिनेमात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका साकारली. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.१९८७ मध्ये आलेल्या एन. चंद्रा यांच्या ‘प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता सिनेमाची नायिका होती. १९८९ मध्ये आलेल्या ‘परिंदा’ सिनेमात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली.१९९२ मध्ये ‘तिरंगा’ सिनेमाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. ‘तिरंगा’मधले डायलॉग्ज खूप गाजले आणि नाना पाटेकर घराघरांत पोहोचले.
‘सलाम बॉम्बे’ आणि ‘परिंदा’नं ओळख निर्माण केली
१९८८ मधील ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने नानांकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधलं. मात्र १९८९ मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
सामाजिक भान जपणारा दिग्गज अभिनेता
नाना पाटेकर केवळ दिग्गज अभिनेतेच नाहीतर, सामाजिक भान जपणारे आणि असणारे अभिनेते होते. नाना पाटेकरांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या बरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते.
नानाची वाडी या शेतात प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्काराची तयारी : गुरुवारी पहाटेच्या वेळेस ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेक कलाकार, राजकीय नेते तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांनी प्रतिक्रिया देत नाना यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयी लाभलेला सहवास आणि त्यांच्याबाबत झालेली शेवटची भेट याबाबत आपलं मत व्यक्त केलं. सकाळी डोणजे येथील त्यांच्या नानाची वाडी या शेतात प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कारची तयारी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिवाचे दर्शन घेतलं : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोवा येथून पुणे विमानतळ येथे आणण्यात आलं आणि तिथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिवाचे दर्शन घेतलं. यानंतर डोणजे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, यांच्यासह विविध कलाकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.



