पुसद मतदारसंघात भाजपने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाकरी फीरवली; तरीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत निरुत्साहाचे वातावरण!
हे नवनियुक्त पदाधिकारी भाजप पक्षाला तारतील की मारतील.?

पुसद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. त्याच अनुषंगाने पुसद जिल्ह्यात सुद्धा पक्षाच्या वतीने फेरबदल झाले आहे. गेल्या ७३ वर्षापासून या मतदारसंघावर नाईक घराण्याची एकहाती सत्ता राहिली आहे. त्यामुळे नाईक घराण्याचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघाची ओळख आहे. परंतु काही वर्षांपूर्वी नाईक घराण्याला तडा गेला होता महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक त्यांचे पुतणे ॲड.निलय नाईक यांनी भाजपच्या कोट्यातून आमदारकी मिळवून भाजपच्या पारड्यात जाऊन बसले. परंतु भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्ष या शहरात जिवंत ठेवला त्या कार्यकर्त्यांनी नाईक घराण्याला व त्यांच्या पक्षाबरोबर संघर्ष केला. त्याच पक्षातील कींवा त्याच घराण्यातील उमेदवार लादल्याने भाजपच्या एका गटाला हे खटकू लागले व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली होती पण राजकारणात आजचे शत्रू हे उद्याचे मित्र असतात. प्रेमात आणि राजकारणात सर्वकाही माफ असते असं बोलल्या जाते मात्र त्यामुळे कुणीही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी नाराज नाहीत. असे भासवले जाऊ लागले.”पक्षाचा आदेश सर आंखों पर” म्हणून काम करू लागले कधीकाळी कार्यकर्त्यांची मजबूत फळी असलेल्या जुनी व नवीन भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. तर ॲड.निलय नाईक यांचे मतदारसंघातील व पक्षातील काम निराशाजनक राहीले जिरवा जिरवीच्या नादात माजी आमदारांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला असल्याची चर्चा आहे. हे सत्तेत असून सुद्धा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे, ऐनवेळी इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना मिळालेले झुकते माप देणे, अशी कितीतरी कारणे या मागे होती. त्यामुळे या पक्षात लाथाळ्य़ा वाढल्याने पक्षाला मरगळ लागली होती. त्यांच्यापैकी बहुतेक जण भाजपच्या आंदोलन, बैठकांना लांबूनच ठेंगा दाखवताना दिसत होते तर वर्षभर खांद्यावर झेंडे मिरवायचे. मात्र, देण्याची वेळ येताच नेत्यांनी इतरांवर विश्वास दाखवायचा, या भूमिकेमुळे निष्ठावान कार्यकर्ते सुद्धा अंतर राखून वागतात दिसून येत होते. तर पक्षाने यांच्यावर पक्षवाढीसाठी जबाबदारी दिली होती ते कुठेही सक्रीय झाले नाही किंवा ग्रामीण भागात कुठेही शाखा स्थापन केल्या नाही पक्षाचे एखाद्या मोठ्या नेत्यांचे शहरात आगमन झाल्यावर मात्र पहिल्या पंक्तीत दर्शन देतात, असे चित्र होते. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत आल्याने आमदार इंद्रनील नाईक यांनी महायुतीत कडून निवडणूक लढवून भरघोस मतदानाने निवडून आले व मंत्री झाले आणि त्यांची ताकद वाढली व मतदारसंघात मोठी पकड निर्माण केली. पण एकीकडे आता भाजपने संघटन पर्व अभियान राबविले. त्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात येणार आहे परंतु खरोखरच हे जे सदस्य नोंदणी केली आहे ते सदस्य या मतदार संंघात भाजपच्या विचारसरणीचे आहेत कां.? हे मात्र संशोधनाचा विषय आहे.आधीच अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे दुरावलेल्या भाजपप्रेमींना पुन्हा पक्षासोबत घेण्यासाठी प्रयत्नांना कृतीची जोड द्यावी लागेल. असे प्रयत्न झाले तरच पक्षाचा जनाधार टिकून राहण्यास मदत होईल.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने भाकरी फिरवली आहे. भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अखेर भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची व शहराध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली पण गेले काही वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिल्यानंतर या निवडणुकीची अगोदरपासून तयारी सुरु केलेल्या भाजपने आता तिला अधिक वेग दिला आहे.अशा महत्त्वाच्या शहरात मरगळ आलेल्या भाजपची धुरा नवनियुक्त जिल्हाध्यक्षपदाचा व शहराध्यक्षपदाचा काटेरी मुकूट सांभाळताना मरगळ आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चेतवायचा असून, मित्रपक्ष महायुतीमध्ये नव्याने चैतन्य निर्माण करून ग्रामीण भागात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील तसेच नगर परिषद वॉर्डातील बालेकिल्ले भुईसपाट करण्यासाठी या पक्षातील पदाधिकाऱ्यांची पक्कड आहे कां.? हे भारतीय जनता पक्षासाठी संशोधनाचा विषय आहे. देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सत्तेत असून सुद्धा पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्याची कामे होत नसल्यामुळे यांच्यामध्ये अधिच नाराजीचा सूर आहे. कारण स्थानिक पातळीवर या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षापुढे महाविकास आघाडीचे तगडे आव्हान राहणार आहे त्यामुळे या सर्व नवनियुक्त अध्यक्षांचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कस लागणार आहे. तसेच या निवडणुकीतील कामगिरीवर या नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे पुढे मूल्यमापन होईल.



