यवतमाळमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर धाड ; तिस सिलेंडर जप्त, तिघांवर गुन्हा दाखल!

यवतमाळ/प्रतिनिधी : शहरातील धामणगाव रोडवरील सुरजनगर परिसरात अवैधरीत्या गॅस सिलेंडर साठवून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत एकूण ३० सिलेंडर जप्त केले. या कारवाईत २८ घरगुती आणि २ व्यावसायिक असे वेगवेगळ्या कंपन्यांचे रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले असून एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तहसील कार्यालयाच्या पथकाने संबंधित भाड्याच्या घरावर छापा टाकून हा साठा उघडकीस आणला. यावेळी प्रकाश सोमनदास मंगतानी (६०), पराग सुरेश तिडके (४४) आणि संजय शंकर घोसे (४१), तिन्ही रहिवासी यवतमाळ, यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांनी समाधानकारक माहिती किंवा कागदपत्रे सादर केली नाहीत.या प्रकरणी अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ अन्वये यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी निलेश भास्कर कळसकर, पुरवठा निरीक्षक सीमा दोंदल आणि महसूल सहाय्यक विष्णू डोळसे यांच्या पथकाने पार पाडली.



