ईतर

जगण्याचा हेतू हा इतरांच्या गरजेमध्ये दडलेला असतो -पद्मश्री डॉ. अभय बंग

श्री शिवाजी शिक्षण संकुलात सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यान पुष्प संपन्न

पुसद : जीवन जगताना जगाकडे पाठ फिरवा म्हणजे सर्व जग तुमच्या पाठीमागे उभे राहील माझे जगणे हे अमूल्य आहे स्वार्थाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडा व गरजू व्यक्तीच्या उपयोगी पडा व्यक्तिगत सुरक्षितते ऐवजी समाजाची सुरक्षितता महत्त्वाची आहे हे समजून आपल्या प्रजातीचे रक्षण करण्यासाठी तत्पर असणे म्हणजेच आपल्या जगण्याचा हेतू हा इतरांच्या गरजेमध्ये दडलेला असतो. असे परखड मत महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी प्रथित यश लेखक व शोधग्राम (सर्च) चे संस्थापक डॉ .अभय बंग गडचिरोली यांनी व्यक्त केले.

ते श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जलसंधारणाचे प्रणेते कै. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोप्यमहोत्सवी स्मृती व्याख्यान पुष्पात बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. एन पी हिराणी ,श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे आधारवड विजयराव पाटील चोंढीकर.

उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल ,दीपक आसेगावकर, डॉ उत्तमराव रुद्रवार यासह प्रमुख वक्ते पद्मश्री डॉ अभय बंग विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती ,छत्रपती शिवाजी महाराज, कै. सुधाकरराव नाईक ,लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांना अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर यांनी प्रमुख वक्ते डॉ. अभय बंग यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला तर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष एडवोकेट आशिष भाऊ देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल यांचे स्वागत केले. त्याचबरोबर उपेंद्र वेद पाठक यांचा सत्कार उपप्राचार्य दत्तात्रय जीवने यांच्या हस्ते करण्यात आला.

‘या जीवनाचे काय करावे ?’ या विषयावर बोलताना डॉ. अभय बंग आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की समाज परिवर्तनाचे अनेक पर्याय आहेत त्यापैकी आपले रोजचे जगणे हे एक समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे .आपण कसे चालायचे ,कसे वागायचे ,काय खायचे ,कपडे कोणते घालायचे पर्यायाने आपल्यासाठीच जगात जे चालू आहे ते सर्व आपल्यासाठी चालू असून त्यावर संपूर्ण अर्थव्यवस्था चालत आहे .आपले छोटे छोटे निर्णय हा जगण्याचा जाहीरनामा आहे त्यातून तुम्ही पृथ्वीचे भविष्य ठरवू शकता .खुज्या माणसांच्या सावल्या लांब लांब पडायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असे समजावे त्यासाठी बदल आणि परिवर्तन करताना त्याची सुरुवात स्वतःपासून करा असेही ते आवर्जून म्हणाले .व्याख्यान पुष्पाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ उत्तमराव रुद्रवार यांनी तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी केले वृषाली खैरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सारंग कोरटकर व महेंद्र अंबुरे यांनी अभिवादन गीत सादर केले. व्याख्यानास पुष्पावंती परिसरातील गणमान्य मान्यवर पत्रकार तसेच मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close