गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे माणूस घडवण्याचा कारखाना – जिल्हा सेवाधिकारी दत्ताभाऊ मारकड यांचे प्रतिपादन!
पुसद येथे ग्रामजयंती सोहळा उत्साहात संपन्न!

पुसद : सुसंस्कार व सत्संगतीमुळे माणसाची प्रगती होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या हयातभर अंधश्रद्धा, अस्पृश्यता, व्यसनाधिनता यावर प्रहार करून माणुसकी, समतावादी व मानवतावादी विचारांचे समाजप्रबोधन केले. त्यांनी गावोगावी स्थापन केलेले गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे माणूस घडवण्याचा कारखाना असल्याचे प्रतिपादन जिल्हा सेवाधिकारी दत्ताभाऊ मारकड यांनी येथे केले. 
श्री गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा, पुसदच्यावतीने मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११७ वी जयंती अर्थात ग्रामजयंती सोहळा गुरुवारी (दि ३०) स्थानिक जिजामाता चौक, देशमुखनगर येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दत्ताभाऊ मारकड बोलतहोते.
अध्यक्षस्थानी कृषिभूषण दीपक आसेगावकर होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, कार्यकारी अभियंता (वीज वितरण) जनार्दन चव्हाण, ठाणेदार सेवानंद वानखडे, डॉ राजेंद्र जाजू, जिल्हा भजन प्रमुख यादवराव पिंगळे, आर्णी तालुका सेवाधिकारी मारोती पिलावन, मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली. त्यानंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीता वाचन घेण्यात आले. 
यावेळी राष्ट्रसंतांचे समाजकार्य व ग्रामगीता ग्रंथाचा आपल्या भजन, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणारे ग्रामगीताचार्य राजेंद्र काळबांडे यांना प्रतिष्ठेचा ‘श्री गुरुदेव भूषण पुरस्कार-२०२६’, आणि मंडळातर्फे दर गुरुवारी आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेला वर्षभरात जास्तीत जास्त वेळा उपस्थित राहणारे रमेश सरागे व वसंतराव ढोणे आदींना ‘प्रार्थनाप्रेमी पुरस्कार- २०२६’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच यंदा मंडळातर्फे हनुमान मंदिर, अमरनगर (श्रीरामपूर) येथे २३ ते २८ एप्रिल दरम्यान ‘सामूहिक ग्रामगीता पारायण सोहळा’ उपक्रम राबविणारे हभप विठ्ठल महाराज भोयर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण, डॉ राजेंद्र जाजू, यादवराव पिंगळे पाटील आदींनी समयोचित मार्गदर्शन करून पुसद तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्याचे कौतुक केले. राष्ट्रवंदना व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची खंजिरी भजने साग्रसंगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.प्रास्ताविक मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे यांनी केले. संचालन मुंगशीराम कदम यांनी तर आभार प्रा. नंदकुमार खैरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, सचिव ॲड गजानन साखरे, प्रचार प्रमुख राजेंद्र काळबांडे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरडकर, भजन प्रमुख माधवराव जाधव, सदस्य नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, प्रमोद जयस्वाल, डॉ शरद राऊत, यशवंत देशमुख, विठ्ठल येवले, अनिल अस्वार, डॉ अनिल भावसार, प्रशांत आत्राम, राजू पुरी, पांडुरंग शिनगारे, बाबासाहेब वाघमारे, राजू बनस्कर, गिरीश पदमगिरवार, दिवाकर मोरे, अरविंद देशमुख, रमेश सरागे, वसंत ढोणे, भीमराव महाराज पवार, ज्ञानेश्वर इंगोले, जयसिंग राठोड, किसन गरडे, महिला प्रतिनिधी छाया लामणे, मंगला पंडित, माया काळबांडे, चंदा गोडसे, संध्या पवार, इंदू राऊत, माधुरी वांझाळ, शीला जाधव, जया मोरे, चारू देशमुख, अनिता सूर्यवंशी, शीतल सरडे, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पुसद शहर व तालुक्यातील गुरुदेवप्रेमी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



