मायबाप सरकार टंचाई नाही मग पेट्रोल पंपावर रांगा कां.? पुसद शहरात पेट्रोल टंचाई? पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; अफवा की सत्य? नागरिकांमध्ये संताप!
साठेबाजी करणाऱ्याकडे संबंधित प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची डोळेझाक!

पुसद : आखाती देशांमधील संघर्षामुळे भारताच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊन घरगुती गॅस सिलिंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे, यामुळे सर्वसामान्या समोर गॅस पुरवठ्याचे संकट उभे ठाकले आहे आणि गॅस सिलिंडर टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरली होती. ही अफवा शांत होत असताना गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोलची टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा पसरली आहे. याची धास्ती घेऊन वाहन धारकांकडून पेट्रोल पंपावर गाड्याच्या टाक्या फुल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅससाठा मुबलक प्रमाणात असून त्याचे पंप मालकांनी प्रशासनामार्फत व पंप चालक काटेकोरपणे सनियंत्रण केले जात आहे, असा दावा संबंधित प्रशासनामार्फत वारंवार केला जात आहे.
मंगळवारपासून (दि.२४) रोजी सायंकाळी शहरातील विविध पेट्रोल पंपावर लागलेल्या वाहनांच्या रांगा भविष्याची चिंता वाढविणाऱ्या दिसत आहेत. मात्र शहरातील काही पेट्रोल पंप बंद झाले असून स्टॉक नसल्याचे बोर्ड लागले असल्याने लोक संतप्त आहेत. अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मायबाप सरकार टंचाई नाही मग या शहरात पेट्रोल पंपावर, गॅससाठी रांगा कां.? हा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
मात्र शहरातील व ग्रामीण भागातील काही साट्टेबाजाकडून पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरची साठेबाजी सर्रासपणे सुरू असताना मात्र सबंधित प्रशासन पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. हातावर पोट असणारा सर्व सामान्य नागरिक कामधंदा सोडून रांगेत लागणार कसा आणि गरजेपेक्षा अधिक पेट्रोल कशाला घेणार ? हा सवाल काहीं नागरिक उपस्थित करीत आहेत.
या आधीच स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वरिष्ठ पातळीवरून आढावा घेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला आवश्यक तेवढीच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहन सुद्धा संबंधित प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, रामनवमीच्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमात या गर्दीत वाढ आजही मोठ्या प्रमाणावर शहरात दिसत असुन शहरातील अनेक काही पेट्रोल पंप बंद झाले असून स्टॉक नसल्याचे बोर्ड लागले असल्याने काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर उर्जेबाबत केंद्र शासन तसेच राज्य सरकारकडूनही यापूर्वीच स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध अत्यावश्यक बाबींच्या सनियंत्रणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान ,अत्यावश्यक सेवेबाबत चुकीच्या अफवा पसरविणाऱ्यांबद्दल अथवा यात अडथळा आणणा-यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, हा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण करण्यास संबंधित शासनाची व प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरल्याने सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत.



