पत्नीचा खून पतीस जन्मठेप;पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल!

पुसद: येथील न्यायालयात जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रं- १ व्ही. बी. कुळकर्णी यांनी पत्नीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीस आज जन्मठेप आणि १०,०००/- रू दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महीने साधी शिक्षा अशी शिक्षा सुनावण्यात आली.
सुनिल वाघोजी बोखारे (वय अं ३५ वर्ष रा. बांन्शी ता.पुसद जि.यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद तालुक्यातील मौजे बान्सी येथील आरोपी सुनिल वाघोजी बोखारे हा मय्यत पत्नी मनिषा सोबत एकत्र कुटुंबामध्ये राहत होता. दि. ६ ऑगस्ट२०१७ रोजी सर्व कुटुंबाने सोबत जेवण केल्यानंतर रात्री आरोपी व मनिषा त्यांच्या रूम मध्ये झोपण्यास गेले, सकाळी चार वाजताचे दरम्यान आरोपीची आई जागी झाली असता तिला आरोपीचे रूमचे दार उघडे दिसले. खोलीमध्ये जाऊन पाहीले असता मनिषा हीचा मृतदेह पलंगाचे बाजुस खाली पडलेला होता व आरोपी बाजुला उभा होता. मनिषा हिचे गळयावर व चेह-यावर ओरखडे होते. आरोपीचे आईने आरोपीस विचारणा केली असता आरोपीने सांगीतले की मनिषा पडली आहे आणी बेशुध्द झाली आहे. आरोपीचे आईने आरडा ओरड केल्याने शेजारी जमा झाले व तात्काळ मनीषाला पुसद येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मनीषाला मयत घोषित केले. मनिषा मयत झाल्याने आरोपी रुग्णालयातून फरार झाला. मनिषाच्या मृत्युची बातमी तिच्या माहेरी कळाले असता माहेरचे लोक तात्काळ रुग्णालयात आले व आरोपीचे गैरहजेरीमध्ये शवविच्छेदना नंतर अंतीम संस्कार करण्यात आला. शवविच्छेदनामध्ये मनिषा हीचा गळा दाबुन खुन केल्याचे डॉक्टरांनी शविच्छेदनाचाअहवाल दिला. त्यानंतर मयत मनिषाच्या भावाने पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली की, आरोपी सुनिल हा पत्नी मनिषा हीच्या चारित्रावर नेहमी संशय घेत होता आणी त्यानेच मनिषाचा गळा दाबुन खुन केला आहे. फिर्यादीने दिलेल्या तकारीवरून पो.स्टे. पुसद ग्रामीण येथे आरोपीचे विरूध्द भा.द. वी. चे कलम ३०२ अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला.या गुन्हयाचा पोलीस अधिकारी पो.नि. धनंजय जगदाळे यांनी अधिक तपास केला असता अनेकाचे बयाण नोंदविले त्यानंतर आरोपी विरूध्द भरपुर सबळ पुरावा उपलब्ध करून दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयामध्ये हे प्रकरण पुराव्या साठी लागल्यानंतर आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्याकरीता सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये मयत मनिषा हीचा भाऊ प्रशांत दरोडे, आजोबा रामाजी गोडंबे, डॉ. उमेश मडावी, डॉ. जयकुमार नाईक तसेच पंच साक्षदार रवि शिंगणकर, प्रेमेन्द्र चौधरी, शेख सद्दाम, गजानन राठोड यांची साक्ष महत्वाची ठरली. घटना घडल्यानंतर आरोपीस ५ दिवसांनी अटक करण्यात आली. आरोपीस अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता त्याचे हातावर चावा घेतल्याचे निशाण असल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालामध्ये सांगीतले. तसेच आरोपीचे कपडयावर सुध्दा रक्ताचे डाग असल्याचे न्याय वैद्यकीय अहवालामध्ये दिसुन आले. एकंदरीत मयत मनिषा व आरोपी हे दोघेच खोली मध्ये असल्याने तिचा खुन कसा झाला व कोणी केला या बाबतचे कोणतेही स्पष्टीकरण आरोपीने पुरावा देवुन सिध्द केले नाही. याउलट आरोपीनेच त्याची पत्नी मनिषा हीचा खुन केल्याचे सरकारी पक्षाने सिध्द केले. सरकारी पक्षातर्फे सादर केलेले पुरावे व सरकारी वकील ॲड, महेश निर्मल यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी सुनिल वाघोजी बोखारे याचे विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायधिश क्रमांक १ श्री. व्ही. बी कुळकर्णी यांनी आरोपीस जन्मठेपे ची शिक्षा व १०,००० हजार रू. दंड तसेच दंड न भरल्यास सहा महीने साधी शिक्षा सुनावली. सदर प्रकरणामध्ये शासनाची बाजु सरकारी वकील ॲड. महेश निर्मल यांनी प्रभावीपणे मांडली.



