पेट्रोल पंपावर इंधन टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारक हैराण!

पुसद : शहरासह तालुक्यात पेट्रोल व डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर इंधन मिळत नसल्याने शेतकरी, वाहनधारक व लहान व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत.डिझेल टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे शेतकऱ्याची पावसाळा तोंडावर येत असताना पुसद परिसरातील शेतकरी लगबगीने मशागतीच्या कामांना लागले आहेत. नांगरणी, शेतीची स्वच्छता, खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्यास पेरण्या वेळेत करता याव्यात, यासाठी हे पूर्वतयारीचे नियोजन शेतकऱ्याचे सुरू आहे. त्यासाठी शहरात डिझेलसाठी शेतकरी पहाटे पाच वाजल्यापासून हातात कॅन घेऊन रांगेत उभे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.या इंधन टंचाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.या महिन्यांत नांगरणी, वखरणी, जमीन सपाटीकरण, अशी विविध कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. मात्र, डिझेल अभावी ट्रॅक्टर बंद पडले त्यामुळे शेतीचे कामे खोळंबली आहे दुसरीकडे शेतीत गेल्या काही दशकांपासून मोठे बदल घडले आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बैलांची जोडी दिसायची. नांगरणी, पेरणी आणि इतर शेतीची कामे बैलांच्या साहाय्याने पूर्ण व्हायची. पण आधुनिक काळात बैलांचा वापर झपाट्याने कमी होत आहे, आणि त्याची जागा ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर यंत्रांनी घेतली आहे. यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे अल्पभूधारक होणे, बैलांऐवजी यंत्रांचा गरजेनुसार वापर, रोजगाराचे बदलते रुप, स्थलांतराचा समावेश आहे. या बदलामुळे शेतीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांचे जीवनही बदलत आहे. जुन्या काळात शेती पूर्णपणे बैलांवर अवलंबून होती. बैल हे शेतकऱ्यांचे खरे सहकारी होते. नांगरणीपासून मळणीपर्यंत सगळी कामे बैलांने करायचे. बैल पाळणे त्या काळात सोपे आणि स्वस्त होते. त्यांना चारा म्हणून शेतातूनच गवत, पेंढा मिळायचा, आणि त्यांच्या शेणाचा उपयोग खत म्हणून व्हायचा. पण गेल्या ३०-४० वर्षांत शेतीची परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. आधिच शेतकऱ्यांचे जमिनीचे क्षेत्र कमी होत चालले त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली. छोटे शेतकरी शेतातली कामे संपली की इतरत्र पोटाची खळगी भरण्यासाठी कामे करतात. त्यांना फक्त बैलांसाठी अडकून पडणे नपरवडणारे आहे. तर नकदी पिकांचे प्रमाण वाढल्याने बैल सांभाळणे परवडत नाही. बैलांना चारा, गोठा आणि देखभालीसाठी खर्च येतो, जो अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडत नाही.१९७० आणि १९८० च्या दशकात हरितक्रांतीमुळे शेतीत यांत्रिकीकरणाला चालना मिळाली. ट्रॅक्टर आणि इतर यंत्रे शेतात दिसू लागली. ही यंत्रे जलद आणि कार्यक्षम होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी हळूहळू बैलांचा वापर कमी केला. आज बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर, थ्रेशर आणि इतर यंत्रांचा वापर करतात, ज्यामुळे कामाचा वेळ आणि मेहनत वाचते.पंरतु आज या इंधन टंचाने अनेक शेतकऱ्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे आगामी खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही पेट्रोल पंप चालकांकडून मनमानी होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. काही ठराविक वाहतूकदार व ओळखीच्या लोकांनाच इंधन दिले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सर्वसामान्यांना तासन्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.तालुक्यात परिस्थिती अधिकच बिकट आहे. अनेक गावांमध्ये शेतकरी ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच दुचाकीधारकांना रोजच्या कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, कामगार व छोटे व्यापाऱ्यांवरही या इंधन टंचाईचा परिणाम होत आहे.काही पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लावले जात आहेत. पण ज्या पंपांवर साठा उपलब्ध आहे; तिथे मोठी गर्दी होताना दिसत आहे.काळाबाजाराची शक्यता नाकारता येत नाही, तसेच काही पेट्रोल पंप मापात पाप करण्याचे काम देखील करीत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्राधान्य देण्याची गरज आहे मात्र या शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही ही टंचाई नसून व्यवस्थेचा अपयश आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून पंपचालकांची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व वाहनधारकांनी केली आहे. तालुक्यातील नागरिकांनी तहसील प्रशासन, पुरवठा विभाग व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून: इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे



