पुसद येथे ७ नोव्हेंबरला राज्यस्तरीय आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळावा;आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजन!

पुसद : आपणांस समाजाचं काही तरी देणं लागतं, ज्या समाजात राहतो, वाढतो, तिथून आपल्याला खूप काही मिळते—शिक्षण, सुरक्षितता, नातेसंबंध आणि जगण्याची संधी. या उदात्त भावनेतून आदिवासी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी समाजातील विवाहयोग्य मुला-मुलींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, समाजातील विवाहविषयक अनावश्यक खर्चाला आळा बसावा आणि समाजात एकोपा व सामाजिक सलोखा वाढावा, या उद्देशाने आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य (ट्रेड युनियन नोंदणी क्रमांक NGP 5887), शाखा पुसद यांच्या वतीने राज्यस्तरीय आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा शनिवार, दि ७ नोव्हेंबर २०२६ रोजी पुसद येथील जिजामाता मंगलम, कारला रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मा. लक्ष्मण टारफे राहणार असून, उद्घाटक म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त माधवराव वैद्य साहेब यांच्या उपस्थित तसेच आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची प्रमुख उपस्थितीत तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी आणि समाजबांधवांच्या साक्षीने उपवर- वधू परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विवाहयोग्य मुला-मुलींची शैक्षणिक, कौटुंबिक व वैयक्तिक माहिती समाजबांधवांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विवाह जुळविताना होणारा अनावश्यक खर्च कमी करून आर्थिक बचत मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी उपयोगात आणावी, हा देखील या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.केवळ उपवर-वधू परिचय एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून, आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कर्मचारी व अधिकारी बांधवांच्या समस्या, तसेच अडचणीत असलेल्या समाजबांधवांच्या कुटुंबांना सहकार्य करण्याबाबतही या मेळाव्यात सकारात्मक विचारविनिमय करण्यात येणार आहे.या राज्यस्तरीय मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून अंदाजे दोन हजार समाजबांधव उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.तरी महाराष्ट्रातील आंध आदिवासी समाजातील सर्व उपवर-वधू, पालक, अधिकारी, कर्मचारी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, शाखा पुसद यांच्या वतीने करण्यात आले आहे.




