पुसद शहरात घुमणार शिवरायांचा जयघोष.! छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव-२०२६ चे मोठ्या थाटात होणार आयोजन…

पुसद:छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या पिढीला समजावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने ३९६वा शिवजन्मोत्सव- २०२६ चे मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करणार येणार असल्याची माहिती छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने आज स्व. शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात भव्यदिव्य आयोजन करण्यात येणार असून या सोहळ्याच्या माध्यमातून सर्वत्र शिवरायांचा जयघोष घुमणार असून ऐतिहासिक संस्कृती, समाजप्रबोधन पुसदकरांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. 
अखंड महाराष्ट्राची अस्मिता स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती पुसद येथे छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२६ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी स्व. शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग मैदानात साय.६.३० वा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनिय कार्यक्रम संपन्न होत असुन उद्घाटनीय सत्रात प्रमुख आमंत्रित वर्धा येथील सप्तखंजिरी वादक समाज प्रबोधनकार इंजि.भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधन पर कार्यक्रम होणार आहे.
दि.१६ व १७ फेब्रुवारीला पुष्पावंती परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना कला मंच उपलब्ध व्हावा ,छत्रपतींचे आचार विचार विद्यार्थ्यांपर्यंत रुजले जावेत या उद्देशाने शिवशौर्यगाथा सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे सोबतच आपले संस्कृती दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाची मेजवानी पुसदकरांना मिळणार आहे. १८ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचा पाळणा महोत्सव संपन्न होईल १९ फेब्रुवारी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याची आकर्षक सजावट पाहायला मिळेल त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर मोटरसायकल रॅली आणि दुपारी २:०० वाजता श्री शिवाजी विद्यालय पुसद येथून शोभायात्रेला सुरुवात होईल. शहरातील मुख्य मार्गांनी हि भव्य शिव शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. शोभा यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण शोभायात्रा डीजे विरहित असून संस्कृती व संस्काराचे दर्शन घडविणारी राहील. या शोभायात्रेत महाराजांची पालखी, अश्वदल विविध प्रकारचे संस्कृती दर्शन घडविणारे देखावे, लाठी काठी पथक , भजनी मंडळासह शाळा महाविद्यालयाच्या झाकी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हरगोविंद कदम मुख्य समन्वयक राजेश साळुंके, मार्गदर्शक दिगंबर जगताप शोभायात्रा प्रमुख एड. भारत जाधव, शिवपूर्व प्रमुख नितीन पवार नितीन पवार, ,मोटार सायकल रॅली प्रमुख अभिजीत पानपट्टे, वैभव फुके, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. गजानन जाधव, यशवंतराव देशमुख, शिव सामान्य ज्ञान समिती प्रमुख चंदू देशमुख यांच्या पुढाकारात विविध समिती प्रमुख व सहकारी, मार्गदर्शक, शिवप्रेमी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. शोभायात्रेदरम्यान जिनिंग प्रेसिंग च्या समोर झाकी मधील सहभागी विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व पाणी ची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच सुभाष चंद्र बोस चौकात विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात येणार असून शोभायात्रेतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व्यवस्था करण्यात येणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाला पुसद शहरातील व परिसरातील समस्त शिवप्रेमींनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सोबतच छत्रपतींचा पराक्रम व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ७ फेब्रुवारीला शिव सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न झाली या परीक्षेत ११००० पेक्षा जास्त विद्यार्थी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.२० फेब्रुवारीला वैभव फुके यांच्या पुढाकारात शरीरसौष्टव स्पर्धा होणार आहे. हा संपूर्ण शिवजन्मोत्सव जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन एकतेची शिकवण देणारा असणार आहे अशी माहिती शिवराय जन्मोत्सव समिती च्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेला-शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह,निशांत बयास,भारतां अन्ना पेन्शनवार, एड. रमेश पाटील ,कैलास गावणार ,किशोर कांबळे, पांडुरंग व्यवहरे शे,ख नईम, इंदल राठोड आदी सामाजिक कार्यकर्त्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी केले .तर प्रा. प्रकाश लामने यांनी उपस्थितांचे आभार मानले.



