पुसद शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं! वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फुटबॉल खेळाचा वाद विकोपाला गोळीबारात एकजण जख्मी!

पुसद : शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून फुटबॉल खेळाच्या वादातून एकाने गोळीबार केला असून या गोळीबारात एकजण जख्मी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह जनमाणसातून उपस्थित केले जात आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निसार टेलर मार्ग, गल्ली वसंत नगर गल्ली क्रं.४ येथे फुटबॉल खेळाच्या वाद विकोपाला गेल्याने एकाने गोळीबार केला. फिर्यादी हसन खान अजीज खान (वय ३५) याचा फुटबॉल खेळाच्या वाद विकोपाला गेल्याने या वादातूनसाहिल व त्याचे साथीदार फिर्यादीच्या घरासमोर येऊन बंदुकीने गोळीबार केला. मावस भाऊ व आरोपी शेख साहिल शेख वजीर (वय २४) रा. मुलतानी तांडा, पुसद यांच्यात फुटबॉल खेळण्यावरून वाद झाला. या गोळीबारात फिर्यादीचे वडील अजीज खान फतेह खान (वय ५२) जखमी झाले. त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूच्या वर गोळी लागली असून सुदैवाने त्यांचा जीव वाचला. फिर्यादीने तत्काळ वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फ्रीयाद दाखल केली या फ्रीयादीवरून आरोपी साहिल व्यतिरिक्त रियाज उर्फ रम्मू अहमद पठाण (वय २८), रा. मोमीनपुरा मुलतानवाडी, मोहम्मद आवेश उर्फ टिंडा मोहम्मद नजीर (वय २७), रा. बॅडकीपुरा वसंतनगर व जुनेद शेखा रफिक शेखा (वय २४), रा. सहारा पार्क, पुसद यांच्यावर कलम १०९(१), ३५१ (२), ३५१ (३), २९६, ३(५) भा.न्या.सं. अन्वये तसेच आर्म अॅक्ट ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे, ही घटना रात्री घडूनही घटनास्थळ पंचनामा दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता करण्यात आला, या घटनेमुळे पोलिसांच्या कामगिरीवर अधिकच टीका होत. या प्रकारामुळे वसंतनगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांनी उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, हा अंदाधुंद गोळीबार केवळ फिर्यादीच्या कुटुंबापुरता मर्यादित राहिला नसता, तर मोठी जीवितहानीही झाली असती. घटनास्थळाला आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक वसंतनगर पुसद सतीश जाधव, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे (पुसद शहर), सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे व पोलीस निरीक्षक आवळकर यांनी भेट दिली.परंतु गेल्या काही वर्षांतील घटना पाहता शहरात जिल्ह्यात पोलीस, गुन्हे शाखा, शोध पथके कारवाई करत असले तरी गावठी कट्ट्यांची आवक थांबलेली नाही असेच चित्र आहे. अनेकजण आपल्या स्थानिक अवैध धंद्यात दहशत म्हणून किंवा काहीजण केवळ हौस आणि दरारा वाटावा म्हणून ही अवैध हत्यारे खरेदी करतात.जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस आपल्या खबऱयांमार्फत माहिती काढून मोठी कारवाई करत आली आहेत.पण अवैध गावठी कट्ट्यांच मुख्य स्रोत कुठं आहे याची माहिती पोलिसांना असून सुद्धा त्यांठीकांणी मात्र कारवाई होत नसल्याने मुळात हे गावठी कट्टे, ते विकणारे किंवा खरेदी करून बाळगणारे हे नगण्य संख्येत असले तरी त्यांची हीमत वाढत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून हे शहर गावठी कट्ट्यांचा हब बनत चाललाय कां? वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना पुन्हा शहरात गोळीबाराची घटना समोर आली आहे.सदर प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलीस करीत आहेत.



