राजकिय

विधपरिषदेच्या उमेदवारीसाठी कॉग्रेस नेत्यांमध्ये सध्या रस्सीखेच ; ग्रामीण भागातील मुस्लिमांना संधी देण्याची मागणी!

पुसद: लोकसभा निवडणुकीत राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात १७ जागा लढवल्या. त्यापैकी १३ जागांवर पक्षाला यश मिळालं. तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. तिरंगी लढतीत बाजी मारणाऱ्या पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनं यंदा एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नव्हता.मुस्लिम जनतेनं लोकसभेत काँग्रेसला चांगली साथ दिली. त्याची परतफेड म्हणून समाजातील नेत्याला विधान परिषदेवर संधी द्यायला हवी, अशी भूमिका राज्यातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे.लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आजच मुंबई व कोकण पदवीधर आणि शिक्षक अशा चार जागांसाठी मतदान झाले आहे. तर कालपासूनच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी अधिसूचना निघाली असून विधानसभेतून विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी उमेदवारी दाखल करण्यास २५ जून पासून सुरुवातही झाली आहे. तथापी फॉर्म भरण्यास अद्याप कोणताही उमेदवार पुढे आला असल्याचे सुत्रांची माहिती आहे. याचे कारण म्हणजे अद्याप कोणत्याच पक्षाची उमेदवारी निश्चित झाली नसून या ११ जागांपैकी महाविकास आघाडीतील तीन पक्षाला दोनच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक जागा काँग्रेस पक्षाला तर उर्वरित जागा शिवसेना उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना उबाठा आणि शरद पवारांची राकाॅं हे उमेदवारी देणार असल्याचे निश्चित मानले जाते. त्यामुळे काँग्रेसच्या एका जागेच्या उमेदवारीसाठी धावाधाव सुरू झाली आहे. केवळ एक जागा असली तरी काँग्रेस पक्षातील असंख्य नेते आपली दावेदारी मांडण्यासाठी दिल्लीत ठिय्या मांडून बसले आहेत. काँग्रेसचे विद्यमान दोन सदस्य निवृत्त झाले असले तरी आमदारांच्या संख्येनुसार एकच जागा त्यांना मिळणार आहे. काँग्रेसचे अनेक आमदार हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर काहींचे निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या आणखीनच रोडावली. या एकमेव जागेसाठी आता ग्रामीण महाराष्ट्रातील मुस्लिम नेत्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आर एम खान नायडू आणि ईक्रम हुसेन या मुस्लिम नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्लीत केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. त्यामुळे मुंबईतून प्रबळ दावेदार समजले जाणारे आरीफ नसीम खान आणि मुजफ्फर हुसेन यांच्यासमोर संकट उभे झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातच माणिकराव ठाकरे सुद्धा आपले नाव पुढे रेटत असल्याचे समजते. मात्र यावेळी मुस्लिम उमेदवारालाच संधी देण्याचे पक्षाने ठरवल्याचे ठामपणे बोलले जाते. त्यामुळे राज्यभरातील मुस्लिम नेते आपली दावेदारी दिल्ली दरबारी रेटत आहेत . येत्या २८-२९ तारखेला यावर पक्षात निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामध्ये आता कोण बाजी मारतो हे येणारा काळच ठरवेल.  ज्या मुस्लिम नेत्यांची दावेदारी मजबूतपणे मांडण्यात आली, त्यामध्ये मुंबईचे आरिफ नसीम खान, मुजफ्फर हुसेन त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे डॉ. वजाहत मिर्झा, डॉ. मोहम्मद नदीम, भंडाऱ्याचे जिया पटेल, नागपूरचे एड. आरीफ कुरेशी,कामठीचे शकूर नागानी, त्याचबरोबर आर एम खान नायडू, ईक्रम हुसेन, परभणीचे एड. माजिद खान ,बीडचे फरीद देशमुख, परभणीचे नदीम इनामदार, मुंबईचे इब्राहिम भाईजान, एमएम शेख तसेच आर्णी यवतमाळचे आरीज बेग यांचा समावेश आहे. ही सर्व मंडळी दिल्लीत तळ ठोकून बसली असून नेत्यांकडे लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत.मात्र विधान परिषदेच्या या जागेसाठी आता पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतील.? याची उत्सुक्ता लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close