शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत उसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ

यवतमाळ/प्रतिनिधी : जिल्ह्यातील पुसद महागाव तालुक्यातील मागील तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील आणि ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत त्या गावच्या ग्रामसेवकांनी सर्व ऊसतोड कामगार ओळखपत्र देणे अपेक्षीत आहे. त्या अनुषंगाने पुसद तालुक्यात ४१२ ऊसतोड कामगाराना ओळखपत्र वाटप करण्यात आले. तसेच २२४ ऊस कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.महागांव तालुक्यात ३० ऊस कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबीर, धान्य वाटप, मुला मुलीनां जातीचे दाखल व उत्पन्नाचे दाखले, तसेच विधवा, निराधार, परित्यक्त्या महीला यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र, दिव्यांगांना प्रमाणपत्र तसेच ऊसतोड कामगार महीला व पुरुष यांच्या बचत गटाची स्थापना करुन देऊन त्यांना ओळखपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण, पुसद चे उपविभागीय अधिकारी कार्तिकेन एस. (भा.प्र.से)पुसदचे गट विकास अधिकारी संजय राठोड, कृषी अधिकारी, नायब तहसीलदार तसेच तांडा सुधार समिती जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे उपस्थित होते.



