केसूर्ली येथील अवैध दारूविक्रीस आळा घाला अन्यथा आंदोलनचा इशारा!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : तालुक्यातील केसूर्ली येथे गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्री केली जात आहेत. दारुच्या विक्रीने तरुण दारूचा घोट घेत नशेच्या आहारी जात आहेत. हे विदारक वास्तव घरच्यांना रोज दिसून येत आहे. दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत आहे. दारू प्राशन करून काही तरुण घरी वाद करतात यातून काही वाद मारामारी पर्यंत देखील जातात. यामुळे परिसरातील अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे.
दारू विक्री करणाऱ्यांना गावातील महिलांनी अनेकदा दारू विक्री बंद करावी यासाठी विनंती केली मात्र दारू विक्री थांबली नाही. दारू विक्रेत्यांनी कोणालाही न जुमानता दारू विक्री सुरूच ठेवली आहे. अवैध दारू विक्री विरोधात केसुर्ली येथील महिलांत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अवैध दारू विक्रीला तात्काळ लगाम लावण्यासंबंधीचे निवेदन दि. २ जूनला केसूर्ली गावातील सरपंच, सदस्य आणि महिला यांनी वणी ठाणेदार यांना दिले. अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला.



