नाला फुटून शेतात शिरले पाणी ; पेरलेले बियाणे गेले वाहून! शेतकऱ्यांचे झाले आर्थिक नुकसान ; शेती गेली खरडून

दिग्रस/प्रतिनिधी:तालुक्यातील निंभा ग्रामपंचायत अंतर्गत जवळा उजाळ काळा पाण्याचा नाला दि.५ जुलै २०२३ रोजी दुपारी आलेल्या ३ वाजताच्या दमदार पावसाने तुडुंब भरून वाहत असतांना अचानक नाला ओवरफ्लो झाल्याने नाला फुटून सरळ आजूबाजूच्या असलेल्या शेताचे बांध फोडून शेतात शिरल्याने शेतात पेरलेले बियाणे जमिनिसह खरडून नेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले.
शेतकरी पहिलेच कर्जाच्या व सततच्या नापिकीला कंटाळून गेला आहे. धूळ पेरणी व पहिल्या आलेल्या पावसात केलेली पेरणी पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवले गेले. अशातच आलेल्या पावसाने शेतकऱ्याने पिके उगवेल या आशेने बियाण्याची पेरणी केली. परंतु तालुक्यातील निंभा अंतर्गत जवळा – उजाळ काळा पाण्याच्या नाल्याला भरघोस पूर येऊन नाला ओवरफ्लो झाल्याने नाला फुटून नाल्या जवळील अजीम खान अमीर खान यांच्या शेत सर्व्हे नंबर ०८ मधील पेरलेल्या बियाण्यासह शेती खरडून जाऊन शेतीच्या बांधावरील दगड शेतात अडकले. तर सरळ असलेली शेती चिखल मातीचे ढिगारे ठिकठिकाणी झाल्याने शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अजीम खान हतबल झाले असून त्यांनी कृषी केंद्रातून उधारीत बियाणे घेऊन शेती केली असल्याचे त्यांच्यावर आर्थिक संकट व दुबार पेरणीचे संकट आल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
याबाबत जिल्हाधिकारी , तहसिल कार्यालय , पालकमंत्री संजय राठोड , कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. या शेतीचा पंचनामा तलाठी चंदेल , कृषी सहाय्यक तेजस्विनी चव्हाण यांनी केला असून शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अशा अजीम खान यांनी व्यक्त केली आहे.



