महावितरणचा गलथान कारभार वाकलेले उच्चदाबाचे विद्युत खांब जीव गेल्यावर बदलणार काय?; संतप्त नागरिकांचा सवाल!

पुसद:तालुक्यातील नानंद ई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नानंद नं.क्रं.१ ते नानंद नं. क्रं.३ मध्ये ११ के.व्ही उच्चदाबाच्या वीजतारा वाहून नेणारे खांब वाकले असून,ते केंव्हाही पावसाळ्यात कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उच्च दाबाच्या विजतारा गावातील नागरिकांच्या लोंबकळत असून,गावकऱ्यांना येथे जीव धोक्यात घालून जीवन जगावे लागत आहे.हे खांब मागील कित्येक वर्षापासून वाकलेले असूनही त्यावर महावितरण कंपनीच्या सावरगाव गोरे सबस्टेनचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे महावितरणच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या सावरगाव गोरे सबस्टेशन वरून चाळीसगाव पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्पासाठी सन २००० साली सावरगाव वरुन नानंद नं. १ नानंद नं.३ते फेट्रा येथे ११के.व्ही. उच्च दाबाच्या विजतारा ओढण्यात आल्या होत्या तेव्हापासून आजपर्यंत महावितरण कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी या विजताराच्या खांबाकडे लक्ष दिले नाही. हे खांब नांनद ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यालगत तसेच रहिवासाच्या घराला लागून असल्याने कित्येक दिवसापासून वादळ वाऱ्यामुळे हे लोखंडी खांब विद्युत वाहिनीच्या तारासह वाकले आहेत काही विद्युत खांबवर तर झाडे कोसळली आहेत .त्यामुळे वाकलेले खांब कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर हा विद्युत पुरवठा करणारा विद्युत खांब रहिवाशाच्या घरावर कोसळला तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नानंद नं.३ येथील रहिवासी शालिक मारकड यांनी वीज वितरण कंपनीला या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनी अद्याप कुठलीच दखल न घेतल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होतोय.याभागात उच्च दाबाच्या विजतारा वाहून नेणारे खांब वाकल्याने वीजतारा या शिवारात लोंबकळत आहेत. पावसाळ्यात येथे धोका निर्माण होण्याची शक्यता असून, खांब कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक दहशतवादी जीवन जगत आहे. वाकलेले काही विद्युत खांब रस्त्याच्या बाजूला असल्याने रोज शेकडो नागरिक ये- जा करीत असतात अशा परिस्थितीत हे खांब कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. परंतु याचे महावितरण कंपनीला गांभीर्य नाही एखाद्याचा जीव गेल्यावर संबंधित खात्याला जाग येईल का.? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.



