शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर पुसदच्या विद्यार्थ्यांची गरुडझेप!

पुसद: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा फेब्रुवारी २०२४ ला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८वी मध्ये पुसद मधील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावून गरुडझेप घेतली आहे.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी मध्ये पुसद येथील जेट्स कीड इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ईशांत माधव कानगुले याने प्रथम भाषा व गणित मध्ये १४६पैकी १४६ व तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीत १४८पैकी १२० गुण असे एकूण २९४ पैकी २६६ गुण प्राप्त करून महाराष्ट्रात सीबीएससी शाळांमधून राज्यस्तरावर पाचवा क्रमांक पटकावला आहे. तो जिल्हा परिषद शिक्षक दांपत्य माधव कानगुले व माया कानगुले यांचा मुलगा आहे. यापूर्वी त्याने सातारा सैनिक शाळेची अत्यंत अवघड असणारी परीक्षा उत्तीर्ण करून तो प्रवेशास पात्र ठरला होता.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी मध्ये पुसद येथील माउंट झी लिटरा स्कूल ची विद्यार्थिनी श्रेया राजेंद्र कदम हिने प्रथम भाषा व गणित मध्ये १४८ पैकी १३८ व तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीत १५०पैकी ११६ गुण असे एकूण २९८ पैकी २५४ गुण प्राप्त करून सीबीएससी शाळांमधून राज्यस्तरावर नववा क्रमांक प्राप्त केला.तिने तीन वर्षांपूर्वी इयत्ता पाचवी मध्येही ८८ टक्के गुण प्राप्त करून राज्याच्या यादीत आठवा क्रमांक प्राप्त केला होता. ती जिल्हा परिषद शिक्षक राजेंद्र कदम यांची मुलगी आहे. तर इयत्ता पाचवी मध्येच स्टेट बोर्डच्या शाळातील शहरी भागातून कोषटवार दौलतखान विद्यालयातील हर्षल रविकांत ईसापूरे याने ८३.६७% गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तो जिल्हा परिषद शिक्षक रविकांत ईसापुरे यांचा मुलगा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



