बुद्धाच्या पंचशीलाचे आचरण केल्यास समाजाचे नंदनवन होईल-किशोर माहुरे यांचे प्रतिपादन;गुरुदेव सेवा मंडळातर्फे बुद्ध जयंती उत्साहात साजरी!

पुसद : जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी सांगितलेले पंचशील जसे मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, कामवासनेपासून अलिप्त राहील, खोटे बोलणार नाही, तसेच मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहील आदी तत्वाचे प्रत्येक मानवाने आचरण केल्यास भारतीय समाजाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ उपासक किशोर माहुरे, नागपूर यांनी येथे केले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ, पुसद तालुका शाखेच्यावतीने स्थानिक देशमुखनगरमधील मंडळाच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनास्थळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची२५६८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून किशोर माहुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आली. त्यानंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रवंदना व जयघोष घेण्यात आला.अध्यक्षीय समारोप करताना प्रा. प्रकाश लामणे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भगवान बुद्धाची २५०० वी जयंती धुमधडक्यात साजरी केल्याचे सांगत ‘हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर’ या ग्रामगितेतील ओव्यांचे स्मरण करून दिले. यप्रसंगी मंडळाच्यावतीने ज्येष्ठ अनुयायी नंदकुमार पंडित व मंगलाताई पंडित तसेच राजू पुरी व सुवर्णमाला पुरी आदींनी ग्रामगीता व बुके देवून प्रा. प्रकाश लामणे यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर गुरुदेव अनुयायांनी एकापेक्षा एक सरस अशी राष्ट्रसंतांची खंजेरी भजने साग्रसंगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन मंडळाचे सहसचिव पांडुरंग बुरकुले यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, उपाध्यक्षद्वय नंदकुमार पंडित व मनोहर बनस्कर, कोषाध्यक्ष सुरेशराव कदम, सहकोषाध्यक्ष माधवराव जाधव, सहसचिव पांडुरंग बुरकुले, प्रचारक किसनराव गरडे, सदस्य अनिल अस्वार, बाबासाहेब वाघमारे, विठ्ठलराव ढोणे, विठ्ठलराव येवले,प्रा. दंडारे, राजू पुरी, राजू बनस्कर, भाऊ कदम, महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे, मंगलाताई पंडित, सुवर्णमाला पुरी, संध्याताई पवार, विमलताई वाघमारे, शांताबाई तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी पुसद शहर व तालुक्यातील गुरुदेव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



