घरमालक घरी झोपलेले असताना सुध्दा ८६ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : शहरालगत असलेल्या लालगुडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या हिराणी ले-आऊट, पटवारी कॉलनी येथील एका राहत्या घरी चोरट्यांनी चोरीचा डाव साधला यामध्ये ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. २९ ऑगस्टला सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबातील सदस्य घरातच झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने चोरीचा डाव साधला. याबाबत प्रवीण मुर्लीधर ताजने (३५) यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहाटे २.३० ते ५.३० वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी घरात शिरून चोरी केल्याचे प्रवीण ताजने यांनी तक्रारीत म्हटले आहे.कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मनी, डोरले असलेली काळी पोत वजन १० ग्राम कि. ३० हजार रुपये, सोन्याच्या तारात विणलेली सोन्याचे मणी असलेली पोत वजन १२ ग्रा. कि. ३८ हजार, ५ ग्रामची सोन्याची अंगठी कि. १२ हजार रुपये, अर्धा ग्रामचे दोन सोन्याचे लॉकेट कि. १५०० रुपये), एटीएम,आधारकार्ड व रोख ४ हजार ५०० रुपये असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत प्रवीण ताजने यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८०, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.



