ईतर

पोदार स्कूलचा स्तुत्य उपक्रम…. पथनाट्यातून प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश

पुसद:प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्षक आहे, प्लास्टिक काढा आणि पृथ्वीचे रक्षक व्हा…असा संदेश विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल मधील वर्ग सहावीच्या मुलींनी पथनाटिकेच्या माध्यमातून दिला.

आपणच आपल्या पर्यावरणाचे रक्षक असले पाहिजे, विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे मूल्य जोपासले पाहिजे या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष श्री शरद मैद तथा संचालक श्री सुरज डुबेवार, श्री संतोष अग्रवाल , श्री मनिष अनंतवार व श्री संगमनाथ सोमावार यांच्या विचारातून प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणारे हे पथनाट्य गणतंत्र दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध भागांमध्ये सादर करण्यात आले. प्लास्टिक हे पर्यावरण व मानवी तसेच जनावरांच्या आरोग्या करिता किती धोक्याचे आहे हे विद्यार्थ्यांनी आपल्या पथ नाटिकेतुन सांगितले. प्लास्टिकचा वापर कशाप्रकारे आजारांना निमंत्रण देतो, प्लास्टिकचे कण मनुष्याच्या पोटात गेल्यावर आजार कसे बळावतात जसे थकवा, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉईड इत्यादी तसेच प्लास्टिक प्रदूषणामुळे हवामानात बदल होतो, प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीव आणि त्यांच्या घरांवर परिणाम होतो, प्लास्टिक प्रदूषणामुळे भूचर आणि जलचर परिसंस्थांवर विपरीत परिणाम होतो हे सगळे आपल्या पथनाट्यातून सांगताना मुलींनी वेगवेगळ्या भूमिका अतिशय उत्तमपणे बजावल्या. प्लास्टिक जनावरांच्या पोटात गेल्यामुळे त्यांना कशाप्रकारे त्रास होतात व मुक-जनावरांना आपल्या प्रणांना मुकावे लागत असल्याचे मुलींनी आपल्या पथनाट्यात दाखविले.

प्लास्टिक निर्मूलनासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करावा, खरेदी करण्याकरिता आपण पुन्हा वापरण्यायोग्य बॅग्स वापराव्यात, प्लास्टिक ऐवजी पर्यायी पॅकेजिंग साधनांचा वापर करावा, बाटलीबंद पाणी पिणे टाळावे, प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करावा असा संदेश जनतेस दिला.हे पथनाट्य बघणाऱ्या प्रेक्षकांनी या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. या पथनाट्यात कलाकार म्हणून अवंतिका भागवत, श्रेया शीलवंत, जुई पतंगे, एंजल झरकर, ईश्वरी खरात, पल्लवी सूर्यवंशी, सदया मोरे, स्मृती गावंडे, अनुष्का गावंडे, शाश्वती खोकले, रीत येरावार यांनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या.तसेच जीवक प्रधान, तन्मय जाधव, पारस आहाळे, अभिमन्यू मस्के यांनी पथनाट्य सादरीकरणात सहकार्य केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व शाळेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय अभिनंदनिय आहे असे प्रेक्षकांनी मत व्यक्त केले. शाळेतून अभ्यासाचे धडे तर शिकविले जातातच परंतु सामाजिक बांधिलकी जोपासणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे असेही या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजविले गेले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सर्व संचालक मंडळ तथा प्राचार्या अनुपमा भट देशमुख,सर्व शिक्षक वृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close