पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत३८ वर्षीय चहा विक्रेत्यांची गळफास घेऊन आत्महत्या!

पुसद: शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नगरपरिषद टेकडी उद्यानात निंबाच्या झाडाला एका ३८ वर्षीय फिरता चहा विक्रेता व्यवसाय करणाऱ्या इसमाने कापडी लुंगीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ जानेवारी रोजी सकाळी ६:०० वाजता घडली. अनंता भोजराज गुडदे वय अंदाजे ३८ वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
अनंता हा शहरात फिरता चहा विक्रीचा व्यवसाय करीत होता.त्यांनी आज सकाळच्या सुमारास बरखा टाकी जवळील नगरपरिषदेच्या टेकडी उद्यानात निंबाच्या झाडाला कापडी लुंगीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आजारी आई, वडील, पत्नी व चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. मयताचे वडील यांच्या खबरी वरून शहर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हे करीत आहेत.



