ईतर

महाराष्ट्र हळहळला! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू,!

पुणे/वृत्तसेवा: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा दि२८जानेवारी २०२६रोज बुधवारी सकाळी ८:४५वाजता बारामती येथे भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये आयोजित केलेल्या चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी ते मुंबईहून पहाटे विमानाने निघाले होते. मात्र, बारामती येथे सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनामुळे केवळ भाजप-नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारमध्येच पोकळी निर्माण झाली नाही, तर त्यांनी नेतृत्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अजितदादांच्या अकस्मात जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ‘दादा’माणूस गमावला असल्याच्या भावना अगदी सर्वसामान्य माणसापासून राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या कर्मभूमीत, बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बारामतीत येऊन दादांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.अजित पवार यांच्यावर आज गुरुवारी सकाळी ११वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची माहिती कळताच जनसागर बारामतीकडे लोटला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच केवळ कार्यकर्तेच नव्हे तर नेत्यांच्याही भावनांचा बांध फुटला. या अपघाताने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिल्लीत संसद अधिवेशनासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आण ि भगिनी सुप्रिया सुळे या अपघाताचे वृत्त कळताच विशेष विमानाने बारामतीसाठी रवाना झाल्या.

कार्यकर्ते, नागरिक धाय मोकलून रडले..

अपघाताची बातमी समजताच बारामतीकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. अनेक कार्यकर्ते आणि नागरिक धाय मोकलून रडत होते, तर काही जण एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडताना दिसले. संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आज आपल्यात नाही, ही भावना बारामतीकरांना अस्वस्थ करून सोडणारी ठरली. सन १९९१ पासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत या परिसराचा कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले होते. केवळ बारामतीच नव्हे, तर पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावरही त्यांची मजबूत पकड होती.

 

विमान कंपनी आणि मॉडेलचा वादग्रस्त इतिहास

 

या दुर्घटनेनंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनी आणि लिअरजेट या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२३ मध्ये याच कंपनीच्या एका विमानाचा मुंबई विमानतळावर धावपट्टीवरून घसरून अपघात झाला होता. त्यावेळी सुदैवाने जीवितहानी झालेली नव्हती, मात्र दोन वर्षांच्या अंतरात एकाच कंपनीच्या दोन विमानांचा महाराष्ट्रात अपघात होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. याशिवाय, ‘लिअरजेट ४५’ या मॉडेलचा जागतिक इतिहासही अशुभ राहिला आहे. मेक्सिकोमध्ये २००८ आणि २०२१ मध्ये अशाच प्रकारच्या विमानांचे भीषण अपघात झाले होते, ज्यात तिथल्या गृहमंत्र्यांसह अनेकजणांना प्राण गमवावे लागले होते, तर २००३ मध्ये इटलीमध्येही याच मॉडेलचा अपघात झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close