ईतर

सायकल रॅली व वृक्ष दिंडीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश!चिमुकल्यांच्या ग्रीन क्लबचा पुढाकार :ई बाईक वाहन धारकांना फळरोपांची भेट देऊन केला सन्मान

पुसद : कवडीपूर येथील इको क्लबच्या चिमुकल्यांनी गावात सायकल रॅली व वृक्ष दिंडीतील विविध घोषणांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना पर्यावरण संवर्धनाच्या विविध कृतींमध्ये थेट सहभागी करून घेणे या उदात्त हेतूने पुसद पंचायत समितीतील भोजला केंद्रातील कवडीपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मागील शैक्षणिक सत्राच्या शेवटी मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक शशिकांत जामगडे यांनी इको क्लबची स्थापना केली व शालेय परिसरातील लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची त्यांचेकडून शपथ घेतली व दररोज रोपांना पाणी टाकून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

दोन मे पासून शाळांना सुट्ट्या लागल्या असल्या तरी आजपर्यंत इको क्लबचे सर्व चिमुकले सदस्य दररोज पाणी घालून संवर्धन करीत आहेत.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिमुकल्यांनी हिरव्या टोप्या परिधान करत आप—आपल्या सायकली आणून व माणूसकीची भिंत ने पुरविलेल्या विविध घोषवाक्यांचे फलक तसेच सत्यसाई सेवा समितीने पुरविलेल्या फणसाच्या रोपट्यांची दिंडी काढून गावात पर्यावरणाचा संदेश दिला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार,मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण,गावचे नायक सखाराम चव्हाण व पालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.दिंडीचा समारोप माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या घरापाशी केला.यावेळी ई बाईक वापरुन पर्यावरणपूरक कार्य करणारे गावातील गजानन पाटील,जगदीश राठोड,प्रकाश चव्हाण,दिलीप राठोड व शिक्षक एस.बी.जामगडे यांचा फणसाची मोठाली रोपे देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपन,संवर्धन, सौर ऊर्जावापर, कचरा व्यवस्थापन,पेट्रोल,डिझेल वरील वाहणांमुळे होणारे जल,वायू,ध्वनी प्रदूषण, दुष्परिणाम, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी मंडळ व ईको क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.शाळांना दिर्घकालीन उन्हाळी सुट्ट्या असतांना देखील इको क्लब राबवित असलेल्या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी धिरज आडे,विस्तार अधिकारी उमेश वाघमारे, शितलकुमार वानखडे आदींसह गावकर्‍यांनी कौतुक केले.

 

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close