स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

पुसद:माजी उपमुख्यमंत्री तथा जनतेच्या मनातील लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुसद येथे दि. २२ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत जनसेवा सप्ताह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, धार्मिक सेवा आणि संघटनात्मक बळकटी या पाचही क्षेत्रांना स्पर्श करणारे उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जनसेवा सप्ताहाची सुरुवात दि. 22 जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्य सर्व पक्षीय सभा घेऊन प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अग्रवाल मंगल कार्यालय येथे नगर परिषद पुसद क्षेत्रातील नागरिकांसाठी मोफत रोगनिदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
दि. २३ जुलै रोजी नगर परिषद क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, राष्ट्रप्रेम आणि संस्कारांची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे वितरण करण्यात आले. शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम पिढी घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
दि. २४ जुलै रोजी जनसेवा सप्ताहांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. श्रीरामपूर परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना घरगुती व शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर पुसद येथील पी.एन. कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट अँड कॉमर्स येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एनसीसी कॅडेट्सच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेला श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालय परिसराची पाहणी करून प्राध्यापक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून प्रत्येक वृक्षाचे संगोपन करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.
याच दिवशी पुसद शहरातील बंजारा कॉलनी येथील संत सेवालाल सांस्कृतिक भवन परिसरात “एक वृक्ष – एक संकल्प” या संकल्पनेतून आणखी एक वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करत नागरिकांना अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रेरित करण्यात आले.
दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून पुसद बसस्थानक परिसरात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तसेच प्रवाशांना फराळाचे वाटप करण्यात आले. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत हजारो भाविकांना फराळाचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत सुख, समृद्धी, आरोग्य आणि भक्तिमय जीवनासाठी मंगलकामना व्यक्त करण्यात आल्या.
दि. २६ जुलै रोजी जनसेवा सप्ताहाचा समारोप नाईक बंगला, पुसद येथे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने झाला. उमरखेड व पुसद तालुक्यातील विविध गावांतील अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेवर आणि नाईक परिवाराच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी समाजातील सर्व घटकांना समान न्याय, विकासाच्या संधी आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीच्या माध्यमातून जोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी, “स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजहिताचे उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असून, जनतेच्या सेवेसाठी असे उपक्रम सातत्याने सुरू राहतील,” असे सांगितले.
नगराध्यक्ष सौ. मोहिनी नाईक म्हणाल्या, “शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजसेवा या माध्यमातून नागरिकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा हा प्रयत्न असून, भविष्यातही लोकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.”
जनसेवा सप्ताहातील सर्व कार्यक्रमांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक, नगराध्यक्ष सौ. मोहिनी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी,पोलीस भरतीची तयारी करणारे युवक-युवती, स्थानिक व्यापारी, विद्यार्थी, नागरिक तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवा सप्ताहातील सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




