पुसद तालुक्यातील शेतकरी हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देणार;वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा पुढाकार!

पुसद :वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद तफेॅ तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राला बुधवारी (ता.२) एक दिवसीय हळद प्रशिक्षण कार्यशाळा व क्षेत्र पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुसद तालुक्यात यंदा हळदीचे विक्रमी उत्पादन घेतल्या जात असून उत्पादक शेतकर्यांना बेणे निवडीपासून ते उत्पादन व विक्री पर्यंतची इत्यंभूत माहिती होण्यासाठी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतफेॅ तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भेटीं दरम्यान केंद्राच्या प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या सेलम, प्रगती, पितांबर, वायगाव आणि लाकाडोंग यांसारख्या विविध हळद वाणांची प्रत्यक्ष पाहणी तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी बेड पद्धत, ठिबक सिंचन आणि खत व्यवस्थापन, हळद पिकावरील कंदकुज आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना, हळद काढणीनंतर तिची उकळणी, पॉलिशिंग, प्रतवारी आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या दर्जाबाबत माहिती तंत्र अधिकारी रमेश देशमुख हे शेतकऱ्यांना देणार आहेत.यावेळी प्रक्षेत्रावरील केंद्राच्या शेडनेटगृहामध्ये हळदीच्या ४१ वाणांच्या मातीविरहित व मातीयुक्त लागवडीचे अभ्यास प्रयोग सुरू आहेत त्याची प्रत्यक्ष पाहणी शेतकर्यांना करता येणार आहे.
हळद संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी ईच्छूक असलेल्या शेतकर्यांनी नोंदणीसाठी ता.१ पूर्वी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सोनी यांच्या भ्रमणध्वनीवर 99609 07980 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.



