जोरदार शक्तिप्रदर्शन करत ॲड. इंद्रनील नाईक यांनी पुसद विधानसभेसाठी केला उमेदवारी अर्ज दाखल!
नाईक घराणे संपविण्यास निघालेल्या विरोधकांना धडा शिकवाः ॲड. निलय नाईक

पुसद : विधानसभेच्या निवडणुकीसाठी ॲड. इंद्रनील नाईक यांनी मोठी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे इंद्रनील नाईक यांना पाठिंबा देण्यासाठी महायुतीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
इंद्रनील नाईक यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शरद मैद तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अश्विन जयस्वाल वंचित बहुजन आघाडी कडून सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी माधवराव वैद्य नाईक कुटुंबातून ययाती नाईक हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.पुसद विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख आहे. विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
नाईक घराण्याने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. कधीहि जातीभेद न करता सर्वांना न्याय मिळवुन देणे ही परंपरा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांनी चालविली आहे. पुढेही ही परंपरा चालवून इंद्रनिल नाईक यांनी सर्वांना समान वागणूक देण्याचे तंत्र राबविले. परंतु विरोधक आता नाईक घराणे संपविण्याची भाषा करीत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार इंद्रनिल मनोहरराव नाईक यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपाचे माजी आमदार ॲड. निलय नाईक यांनी केले. आज दि. २८ रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार इंद्रनिल नाईक यांचे उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी नाईक बंगल्यात जाहीर सभा झाली व त्यानंतर भव्य नामांकन रॅली काढुन निवडणूक निर्णय अधिकारी बिजवल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मनोहरराव नाईक होते. याप्रसंगी डॉ. एन. पी. हिराणी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंतराव घुईखेडकर, माजी नगराध्यक्षा अनिताताई नाईक, मोहितीताई नाईक, महायुतीचे उमेदवार इंद्रनिल नाईक, शिवसेनेचे राजन मुखरे, दौलतराव नाईक, भाजपाचे महेश नाईक, विनोद जिल्हेवार तसेच निशांत बयास, श्रीराम पवार, दीपक उखळकर, दीपक काळे, बी. जी. राठोड, भगवानराव आसोले, बाळासाहेब पाटील कामारकर, निळकंठ पाटील, ॲड.अमेय नाईक, खान मोहम्मद खान, शेख कय्युम, सदबाराव मोहटे, जैनुद्दीन सिद्दीकी, दिलीप पारध, विजय जाधव, सोपान माने, रवि ग्यानचंदानी, रियासत अली, ॲड.विश्वास भवरे, दीपक परिहार, पंजाब भोयर तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नाईक घराण्याचे योगदान पाहता पुढेहि आपला विकास होण्यासाठी इंद्रनिल नाईक यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले.



