आसरपेंड येथे पोस्को कायद्याविषयी जनजागृती शिबिर संपन्न.!

पुसद : दि. २६ फेब्रुवारी २०२६ तालुका विधी सेवा समिती,पुसद व वकील संघ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने ” कॉमन मिनिमम प्रोग्राम ” अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, आसरपेंड,पुसद ता.पुसद जि.यवतमाळ येथे सकाळी ९.३० वाजता पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तदर्थ अतिरित व जिल्हा न्यायाधीश पुसद श्रीमती.सोनल एन.शाह मॅडम उपस्थित होत्या.तसेच पुसद वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲड.अमोल एन.भालेराव तसेच मुख्याध्यापिका श्रीमती.सविता घरजारे मॅडम यांची उपस्थिती लाभली.या शिबिरात ॲड.जयश्री एस.देशमुख सदस्य,वकील संघ पुसद यांनी “Protection of Children from Sexual Offences Act, 2012” (POCSO Act) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी पॉक्सो कायद्याचे उद्दिष्ट,बालकांचे हक्क,तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया,तसेच कायद्यातील तरतुदी व शिक्षांचे स्वरूप याविषयी विद्यार्थिनींना सोप्या भाषेत माहिती दिली. बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जागरूकता आणि तत्परता किती महत्त्वाची आहे,यावर त्यांनी विशेष भर दिला.अध्यक्षीय भाषणात जिल्हा न्यायाधीश श्रीमती.सोनल एन.शाह यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास बाळगण्याचे,कोणत्याही अनुचित प्रकाराविरुद्ध आवाज उठविण्याचे व कायद्याची मदत घेण्याचे आवाहन केले.अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होते,असे त्यांनी नमूद केले.प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या स्वप्नापासून होते.त्यामुळे सर्वप्रथम मोठे स्वप्न बघा.स्वप्न बघण्याची हिंमत ठेवा, कारण ज्यांना स्वप्न पाहण्याची सवय असते,त्यांनाच ते पूर्ण करण्याची ताकद मिळते.तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा.ध्येय समोर ठेवून प्रामाणिकपणे मेहनत करा.अडचणी येतील,अपयश येईल,पण त्यातून शिकत पुढे जात राहा.स्वतःवर विश्वास ठेवा आणि “मी करू शकते” हा आत्मविश्वास कायम ठेवा. तुमच्यात अपार क्षमता आहे.योग्य दिशा, कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकता. तसेच स्वप्न मोठे बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी डोळ्या समोर ध्येय ठेवा असा मूलमंत्र त्यांनी दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.आर्या भगत व कु.अनुष्का कोल्हे या विद्यार्थिनी नी करून शिबिराची सांगता करण्यात आली.या उपक्रमास पीयुष नाईक,मनिषा अमृते,दिनेश पवार,मंगेश लंबे,संदीप चव्हाण,प्रयाग राठोड न्यायालयीन कर्मचारी शशिकांत ढाले,पोलीस कर्मचारी गोपीचंद चव्हाण शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षकवृंद,कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



