संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात समीक्षा अग्रवाल संस्कृत विषयात प्रथम मेरिट.!

पुसदः येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. समीक्षा अखिलेश अग्रवाल हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. (संस्कृत) या अभ्यासक्रमात गुणवत्ता यादीमध्ये प्रथम मेरिट येण्याचा बहुमान प्राप्त करत सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह पुसद शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतीच गुणवत्ता जाहीर केली असून समीक्षा अग्रवाल हिला एम.ए. संस्कृत विषयात ९७.२० टक्के एवढे गुण प्राप्त करून ती विद्यापीठांमध्ये अव्वल ठरली आहे. लवकरच विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करून तिचा गौरव करण्यात येणार आहे.
तिने नाट्यशास्त्र व नाटक, गद्य व महाकाव्य, संस्कृत साहित्य, संस्कृत पत्रलेखन, अर्जलेखन, निबंध तसेच रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट या सर्व विषयांत विशेष प्राविण्य मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच समीक्षा विविध स्पर्धात्मक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत आली आहे. तिला यापूर्वी ‘बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड’ने गौरविण्यात आले असून राज्यस्तरीय तसेच आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धांमध्ये तिने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तिच्या सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि जिद्दीचे हे यश फलित मानले जात आहे. समीक्षा ही येथील हिंदी वाचनालयाचे सचिव तथा पुसद पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व लोकमतचे तालुका प्रतिनिधी अखिलेश अग्रवाल यांची कन्या आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, आणि महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ.वैशाली पांडे तसेच सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



