पुसद शहरात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारणार-नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांची जयंती उत्सवात मोठी घोषणा; दोन हजार चौरस फूट जागा मंजूर, दोन कोटींच्या निधीचा प्रस्ताव तयार!
शहरातून निघालेल्या शोभायात्रेत आदिवासी संस्कृतीचे विलोभनीय दर्शन!

पुसद : शहरात क्रांतिवीर धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ व्यी जयंती मोठ्या उत्साह, आणि जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी आदिवासी अस्मितेचा जागर पाहायला मिळाला. सकाळी नऊ वाजता क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुपारी एक वाजता शहरातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. या जयंती उत्सवाचे औचित्य साधून पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी बिरसा मुंडा चौकात भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
पुतळ्यासाठी सुमारे दोन हजार चौरस फूट जागा मंजूर झाली असून, उभारणीसाठी दोन कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या घोषणेमुळे आदिवासी समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.सकाळी नऊ वाजता क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात आयोजित अभिवादन सोहळ्यात शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष मोहिनी नाईक, माजी आमदार निलय नाईक, इंडियन बार कौन्सिलचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते,पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच असंख्य सकल आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमानंतर दुपारी एक वाजता भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली.शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या शोभायात्रेत आदिवासी संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडले. पारंपरिक लेझीम, ढेमसा नृत्य, ढोल-ताशांचा गजर, साऊंड सिस्टिम आणि विविध पारंपरिक नृत्यप्रकारांनी शोभायात्रेत विशेष रंगत आणली होती.
पारंपरिक वेशभूषा, पिवळे ध्वज आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झालेल्या समाजबांधवांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा जागर घडविणारी ही भव्य शोभायात्रा पुसदकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
या भव्य जयंती उत्सवासाठी यशस्वी आयोजनासाठी बिरसा ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. महिला बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांनीही उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य केले.



