पावसाच्या खंडाने पिके करपली; सेवा नगरात कोरड्या दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू महागाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती; महसूल व कृषी विभागाकडून शेतांची प्रत्यक्ष पाहणी

महागाव : महागाव तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महागाव तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर सेवा नगर येथे दुष्काळग्रस्त व पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले.
महागाव तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने काही भागात पावसाचा दीर्घ खंड पडला. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक शेतांमध्ये पिके वाळून करपू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून आवश्यक माहिती घेण्यात आली तसेच पंचनाम्याची प्रक्रिया करण्यात आली.या पंचनाम्यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक राम जटाळे साहेब, झरेवाड साहेब यांच्यासह सेवा नगरचे पोलीस पाटील रामेश्वर राठोड, सुखदेव राठोड, गजानन लांडगे, कुबेर राठोड, विनोद तुमवार तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शासनाच्या नियमानुसार योग्य ती मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



