लोकशाहीची प्रकिया ‘एसआयआर’च्या कामांत हलगर्जीपणा करणाऱ्या (बीएलओ) ‘बूथ लेव्हल ऑफिसर’वर गुन्हा दाखल!
निवडणुक अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीदरम्यान बीएलओ आढळला दारूच्या नशेत!

पुसद : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुननिरीक्षण म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असताना उपविभागीय अधिकाऱ्याच्या अचानक भेटीदरम्यान नियुक्त करण्यात आलेले पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक (बीएलओ) ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ हे कर्मचारी दारूच्या नशेत मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असताना आढळून आल्याने त्याचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आल्याने निवडणूक कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि राष्ट्रीय सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या मतदार याद्या शुद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणा-या विशेष संक्षिप्त मतदार पुनरिक्षण कार्यक्रम पुसद शहरासह तालुक्यात सुरू आहे.मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीमेत ‘बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) तसेच कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रशासनाकडून निवड करण्यात आली आहे. दि.३० जून २०२६ पासून मतदार पुर्ननिरीक्षण यादी अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती सर्व बिएलओंना दि.२९ जून २०२६ रोजी प्रशिक्षण देण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तालुक्यात नियुक्त केलेल्या सर्व बिएलओं ‘बूथ लेव्हल ऑफिसरना कामात गती वाढविण्यासाठी सक्त आदेश दिले तसेच कामात पारदर्शकता ठेवा,सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करू नका, हलगर्जीपणा करू नका यासह इतरही महत्त्वाच्या गोष्टी लेखी स्वरुपात व वारंवार नोटीस देऊन सांगण्यात आल्या होत्या त्यामुळे मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम असल्यामुळे पुसद शहरातील गढी वार्ड येथील मतदान केंद्र १६९ वर बिएलओ म्हणून गजानन राठोड व पर्यवेक्षक सु.भा.मितक म्हणून यांची निवड करण्यात आली होती.सदर कार्यक्रमांची प्रभावीपणे अमंलबजावणी करणेसाठी पुसद विधानसभा मतदारसंघातील एकुण ३४३ मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. त्यांना प्राशिक्षण देऊन साहित्य सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना हस्तांतरीत करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने पुसदच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कनिष्ठ लिपिक गजानन राठोड ह्यांना कार्यरत केले होते. सद्यस्थितीत जास्तीत जास्त मतदार यादीवर काम करण्याचे युध्द पातळीवर सुरु आहे. सदर कार्यक्रमाकरिता भारत निवडणुक आयोग यांनी कालमर्यादा निश्चित दिलेली असून सदर काल मर्यादेत हे काम पूर्ण करावयाचे आहे. असे असतांना सुद्धा गजानन राठोड यांना वारंवार सुचना देऊनही सदर कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग दिसून आला नाही.त्यांच्या मतदान केंद्रावर एकूण ९७२ मतदार असुन दि. ९ जुलै २०२६ अखेर त्यांनी केवळ दोनच मतदारांची माहिती ऑनलाईन अपलोड केलेली आहे. त्यांच्या कामाची टक्केवारी केवळ ०.२१ टक्के आहे.अशा परिस्थितीत दि.९ जुलै २०२६ रोजीच्या दुपारी अंदाजे ३ वाजताच्या दरम्यान येथील मतदान केंद्रक्रमांक १६९ वर उपविभागीय अधिकारी बिजवल यांनी अचानक भेट दिली असता बिएलओं ‘बूथ लेव्हल ऑफिसर गजानन राठोड हा दारू प्राशन करून असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच त्यांना कामा बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर नआल्याने अशा परिस्थीतीत सदर कर्मचाऱ्याचा वैद्यकीय तपासणी करिता पाठविण्यात आले. वैद्यकीय अहवाल नुसार गजानन राठोड हे दि.९ जुलै २०२६ रोजीच्या दुपारी ३: वाजण्याच्या सुमारास दारू प्राशन करून असल्याचे सिध्द झाल्यामुळे लोकशाही प्रक्रियेत राष्ट्रीय निवडणुक आयोगाकडून ‘एसआयआर’ सारख्या राबविण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात अनियमितता केल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून सदर प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.
वरीष्ठांच्या आदेशाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम नाही.. निवडणुकीचे काम राष्ट्रीय काम असल्यामुळे बिएलओ राठोड हे निवडणूक विषयक कामात गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तसेच वरीष्ठांचे आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून आले.तसेच याबाबत त्यांचे पर्यवेक्षक सु.मा. मितक यांनी अहवाल सादर केला आहे. सदर कामा बाबतीत बिएलओला यापुर्वी वारंवार कामात सुधारणा करणे बाबत वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहे. तसेच कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. परंतु या गोष्टीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.



